'जीआयएस'द्वारे मनपाच्या मालमत्तांचा शोध

ड्रोन सर्वेक्षणासाठी तीस कोटींचा खर्च
'जीआयएस'द्वारे मनपाच्या मालमत्तांचा शोध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेच्या ( NMC )हद्दीत अनेक मोकळे भूखंड, सभागृहे, संकुले अशी कोट्यवधीची मालमत्ता आहे. पण, त्याकडे वर्षोनुवर्ष दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांनी संधी साधत त्यावर अतिक्रमण केले आहे. महापालिकेने स्वत:च्या मालमत्तांचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे. अक्षय इंजिनिअर्स कंपनीच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण करण्यात येत असून,तीन वर्षासाठीच्या या कामासाठी तीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

मागील सहा महिन्यांपासून नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता शोधण्याचे काम या कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. पहिल्या टप्पात ड्रोन सर्वेक्षण ( Survey By Drone )करण्यात येत आहे. त्यानंतर डिजीटल नकाशे तयार केले जाणार आहेत. त्या माध्यमातून मनपाच्या मालकीच्या जागा, अधिग्रहण करण्याच्या जागा, जागेचे मोजमाप, हिरवा, पिवळा पट्टा, मनपाचे विशिष्ट आरक्षण यांची सविस्तर माहिती संगणकाच्या एका क्लिकमध्ये आपणास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता बळकावणार्‍यांचे पितळ उघडे पडणार आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी देखील महापालिकेच्या मिळकती कोणी बळकावल्या याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. अखेर उशीराने का होईना महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी मालमत्ता शोध कामासाठी अक्षय इंजिनिअरिंग कंपनीला काम दिले आहे.

पहिल्या टप्प्याअंतर्गत 269 स्केअर किलोमीटर हद्दीचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम सुरु आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्याच्या नकाशाशी ते जोडले जाईल. त्यातून डिजीटल नकाशे तयार होणार आहेत.

जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम (Geographical Information System)प्रणालीच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या मार्किंगसाठी पाचशे ठिकाणी स्टोन ठेवले जातील. एकदा डिजीटल नकाशे पूर्ण झाल्यानंतर मालमत्तांची ओळख पटवून मग सातबारा उतार्‍यावर नाव लावले जाईल.तसे न आढळल्यास किंवा त्याजागेवर अतिक्रमण अथवा मालमत्ता बळकावल्याचे समोर आल्यास प्रथम नोटीस बजावून समन्स दिला जाईल. तरी देखील न जुमानल्यास महापालिका कोर्टात दाद मागेल.

उत्पन्नात भर पडेल

महापालिकेच्या मालमत्ता अधोरेखित होणार असून, स्वत:च्या मालमत्तांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे नव्याने समोर आलेल्या मालमत्तांना भाडे तत्वावर देऊन त्यापासून उत्पन्न प्राप्त होऊ शकेल.

ड्रोन सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. पुढील अडीच वर्षाच्या कालावधीत मालमत्तेची संपूर्ण माहिती महापालिकेला मिळेल. जनतेसाठी अशी प्रणाली सोयीची होणार असून, त्यामाध्यमातून जवळपासच्या मनपाच्या हक्काच्या जागांची माहिती उपलब्ध होणार आहे.

हर्षद बाविस्कर, अधीक्षक अभियंता, नगर नियोजन

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com