Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासलग सुट्ट्यांमुळे पर्यटन पर्वणी

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन पर्वणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्रावण महिना… रिमझिम पाऊस… तुडुंब भरलेली धरणे… पांढर्‍या शुभ्र धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद आणि दाट धुक्यांच्या दुलईत लपलेल्या हिरव्यागार निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक( Tourists ) सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

महिन्यातील दुसरा शनिवार, रविवार, स्वातंत्र्यदिन आणि पारशी नूतन वर्षारंभ अशा लागोपाठ येणार्‍या चार सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहर व परिसरातील हॉटेल्स आणि रिसॉर्टचे ( Hotels & Resorts ) बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई, पुण्याहून अनेकजण नाशकात दाखल होत आहेत.

जिल्ह्यासह राज्यभर सर्वाधिक लोकप्रिय असलेले त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुके निसर्गसौंदर्य तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहेत. सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्र्यंबकेश्वरमधील ( Trimbakeshwar )बाराव्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन, नयनरम्य धबधबे, गड-किल्ल्यांवरील ट्रेकिंगची पर्वणी पर्यटकांकडून सहकुटुंब साधली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे. या भागातील निसर्गसौंदर्य खूपच खुलले आहे. एरवी प्रत्येक वीकेंडला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नाशिकसह मुंबई, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतील पर्यटकांची गर्दी होतच असते. मात्र सलग सुट्ट्यांमुळे त्या गर्दीत आणखी भर पडणार आहे.

पर्यटनामुळे अर्थकारणालाही गती मिळणार असल्याने लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये उत्साह संचारला आहे. मोठ्या शहरातील धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीला थोडा विराम देऊन आरामासाठी तेथील नागरिक नैसर्गिक वातावरण लाभलेल्या पर्यटनस्थळांना प्राधान्य देतात. श्रावण मासामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय ‘वाईन कॅपिटल’ म्हणून असलेली नाशिकची ओळख, थंड हवेचे ठिकाण, मोकळी व प्रदूषणविरहित हवा या सर्व जमेच्या गोष्टींमुळे पर्यटकांच्या यादीत नाशिक अग्रस्थानी आले आहे.

इगतपुरीसह अनेक पर्याय

इगतपुरी व आसपासच्या परिसराला निसर्गसौंदर्याचे भरभरून वरदान लाभले आहे. उंच डोंगररांगा, कसारा घाट, घाटनदेवी, भावली, दारणा, वैतरणा धरण परिसर, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर, परिसरातील धबधबे, कावनई आदी पर्यटनस्थळांना पर्यटकांची नेहमीच पसंती असते. अनेक लहान-मोठ्या ते आलिशान रिसॉर्टस्कडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.

धोकेदायक पर्यटनस्थळांवर बंदी

उत्साहाच्या भरात अनेक जण धोकेदायक परिस्थितीत अडकून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात. यापूर्वीही अनेक वाईट घटना घडल्या आहेत. त्या लक्षात घेता पर्यटनाला जाताना उत्साह असावा, मात्र तो अति नसावा. हुल्लडबाजी, धिंगाणा, गैरवर्तन, मद्यप्राशन आदी गोष्टी टाळण्याचे आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केले आहे. धोकेदायक ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर बंदीदेखील घालण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या