Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याटोमॅटो उत्पादकांना केंद्राकडून दिलासा मिळणार

टोमॅटो उत्पादकांना केंद्राकडून दिलासा मिळणार

मनमाड । प्रतिनिधी Manmad

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात ( Tomato Rate ) होत असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. हा फटका बसू नये म्हणून केंद्र शासन ( Central Govt ) बाजार प्रोत्साहन योजने (मार्केट इन्सेंटिव्ह स्कीम) अंतर्गत 50 टक्के खर्च सोसायला तयार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.

- Advertisement -

केंद्र शासनाने त्याची जबाबदारी पार पाडली असून या योजनेसाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याचे कळताच डॉ. पवार यांनी तातडीने केंद्राकडे पाठपुरावा केला. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सर्वात जास्त फटका टोमॅटोला बसला असून टोमॅटोचे भाव प्रतिकिलो एक ते दीड रुपयावर आले आहेत. पिकावर केलेला खर्च तर सोडाच वाहतूक खर्चही निघत नसल्याचे पाहून टोमॅटो उत्पादक शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकून देत आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील निफाड, लासलगाव, विंचूर, येवला, नांदगाव आणि मनमाडचा दौरा करत असताना त्यांना टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याची माहिती मिळाली.

त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, पीयूष गोयल यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती देत संंकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून बाजार प्रोत्साहन योजना (मार्केट इन्सेंटिव्ह स्कीम) अंतर्गत केंद्र सरकार 50 टक्के खर्च सोसायला तयार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले.

राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे गरजेचे असून राज्य शासनाने विलंब न करता केंद्र सरकारला योजनेसाठी प्रस्ताव पाठवावा जेणेकरून शेतकर्‍यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगून केंद्रातील मोदी सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी सातत्याने विविध प्रयत्न आणि उपाययोजना करत आहे. राज्यात टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या