
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हा मजूर संघ फेडरेशनच्या चेअरमन,व्हा. चेअरमन पदासाठी आज (दि.10) निवडणुक होत असून याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.फेडरेशनचे माजी अध्यक्ष संपतराव सकाळे आणि राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील गटात या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याची स्थिती आहे. दोन्ही गटातील संचालक सहलीसाठी दोन तीन दिवसांपासूनच रवाना झाले आहेत.चेअरमन,व्हा. चेअरमन पद कोणत्या गटाकडे जाणार याचे भवितव्य आमदार सुहास कांदे,आमदार हिरामण खोसकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हाती आहे. त्यामुळे या तिघांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे.
जिल्हा मजूर संघाच्या 20 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आठ जागा बिनविरोध झाल्यानंतर 12 जागांसाठी मतदान झाले होते. यात येवला, सिन्नर, देवळा, नाशिक, सुरगाणा, पेठ व चांदवड या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढाई झाली.ओबीसी, एससी, एनटी व महिलांच्या दोन जागांसाठीही मतदान झाले. निवडणुकीत पॅनल करायचा नाही असे निश्चित झालेले असताना पॅनल निर्मिती होत तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले होते. आपलं पॅनलच्या मागे फेडरेशनवर वर्चस्व असलेले राजेंद्र भोसले यांनी ताकद उभी केली . तर, सहकार पॅनेलला संपतराव सकाळे यांनी बळ मिळाले.
आपलं पॅनलने एक तर, सहकार पॅनलने दोन जागांवर बाजी मारली. राखीव महिला उमेदवारांना दोन्ही पॅनलचा पाठींबा होता. निवडणुकीनंतर मात्र, सकाळे व भोसले गट कार्यरत होऊन त्यांच्याकडून चेअरमन,व्हा. चेअरमन पदासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यासाठी दोन्ही गटाने संचालकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू करत गळाला लावलेले संचालक सहलीसाठी नेले आहेत. रात्री उशीरापर्यंत सकाळे-भोसले यांच्या गटाकडे सम-समान संचालक झाले होते,असे चित्र होते. उर्वरित संचालकांची भूमिका स्पष्ट नसल्याने मंगळवारी सकाळी त्यांची भूमिका निश्चित होईल,असे सांगितले जात आहे.त्यामुळे निवडणूक चुरशीची की समेटाने बिनविरोध होणार अन कोण कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधले गेले आहे.