'सीईटी'च्या नोंदणीसाठी आज अंतिम मुदत

'सीईटी'च्या नोंदणीसाठी आज अंतिम मुदत

नाशिक । प्रतिनिधी

एमएचटी सीईटी प्रवेश नोंदणीसाठी आता आज 26 ऑक्टोबर रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या उमेदवारांची परीक्षा पुढील 15 दिवसात घेण्याच्या सूचनाही विभागास देण्यात आल्या आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

या पूर्वीची जास्तीत जास्त 5 जागेची अट रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट प्रत्येक अभ्याक्रमाकरीता 5 टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले असून या प्रवेशाकरीता प्रत्येक संस्थेमध्ये असलेली जास्तीत जास्त 5 जागांची प्रचलित अट चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येत आहे.

एमएचटी-सीईटी 2020 ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरीता ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते, परंतु करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे परीक्षेस उपस्थित राहीले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षांबाबत काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत.

त्याबाबत चौकशी करून परीक्षा घेणार्‍या संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. यासाठी चार सदस्यीय सत्यशोधन समिती गठीत करण्यात आली आहे. ज्या विद्यापीठांना आपल्या परीक्षा दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत घेणे शक्य नाही, त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, राज्यपाल व राज्य शासनास अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आले आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बाकी आहे अथवा अन्य कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित परीक्षा या दिवाळीपूर्वी घेण्यात याव्यात आणि कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर करोनाचा उल्लेख राहणार नाही. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये तंत्रशिक्षणातील अभ्यासक्रमास मागास प्रवर्गातील उमेदवारांनी प्रवेश घेतले आहेत. परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाहीत अशा उमेदवारांची यादी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी शासनाकडे पाठवावी. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून सीईटी परीक्षेचे केंद्रतालुका स्तरावर घेण्यात येणार असून त्याची सर्व तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com