Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' चा आज १०० वा भाग

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ चा आज १०० वा भाग

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

देशभरातील कोट्यवधी नागरिकांशी दूरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या आज, रविवारच्या १०० व्या भागाला भाजपने राजकीय उत्सव स्वरूप दिले असून मुंबईत पाच हजार ठिकाणी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज विलेपार्ले येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल हेही अन्य ठिकाणच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

- Advertisement -

पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणूक तयारीचा भाग म्हणून भाजपने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे ठरवले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचा बराच गाजावाजा करण्यात येत आहे. मुंबईतही या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती करण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी फलक, बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुंबई भाजपने विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात मन की बातचे आयोजन केले असून त्याला अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तर नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या पर्वासाठी मुंबई भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा मतदारसंघात ५ हजाराहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजता होणार आहे अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली. मुंबईत पक्षाचे खासदार, आमदार आणि पक्ष पदाधिकारी ठिकठिकाणी आपापल्या विभागातील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महिला कारागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागाठाणेमध्ये घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचत गट तसेच गृहउद्योगातील महिला, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, मुस्लिम महिला, रिक्षाचालक यांना कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. दहिसरमध्ये आमदार मनीषाचौधरी यांच्या नेतृत्वाखाली ५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. भाजप मुंबई युवा मोर्चातर्फे नवीन युवा मतदारांना खास आमंत्रित केले जाणार आहे. ओबीसी मोर्चाच्यावतीने ५० चहाच्या स्टॉलवर मोफत चहा वितरण करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने शीर खुर्मा बेत करत प्रमुख दर्गा, मदरसा आणि उर्दू शाळांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

भाजपा लीगल सेलतर्फे वकिल बांधवांच्या उपस्थितीत ईशान्य मुंबईत कार्यक्रम होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आघाडीकडून खास मुंबईतील डबेवाल्यांसाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दक्षिण भारतीय सेलने वरळीतील महिलांसाठी विशेष कार्यक्रम आखला आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

शतकी कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा : पियुष गोयल यांचे आवाहन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनसंवाद, जनसहभागाचा अनोखा प्रयोग केला आहे. ‘मन की बात’ द्वारे विकासाच्या प्रक्रियेत सामान्य माणसाचा सहभाग वाढवण्याबरोबरच देशहिताची विधायक कामे करणाऱ्यांना कौतुकाची थाप देत पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विविधरंगी भाषिक, प्रादेशिक संस्कृतींचा संगम साधला आहे. अशा ‘मन की बात’ चा १०० वा भाग ३० एप्रिल रोजी सादर होणार असून या ऐतिहासिक क्षणाचे सर्वजण साक्षीदार व्हा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी येथे केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या