राज्यातील ३० जिल्ह्यांत आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

राज्यातील ३० जिल्ह्यांत आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

मुंबई

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज राज्यातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, दि.२ जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्हयात तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहिम राबविण्यात आली आहे.

क्षेत्रिय स्तरावर कोवीन ऍप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्रायरन घेतला जातो.

या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात येईल.

कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com