result
result
मुख्य बातम्या

बारावीचा आज निकाल

Abhay Puntambekar

पुणे । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल.

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा पार पडली. परंतु, करोनाच्या संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. मे-जून महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही १५ जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असे सांगितले होते. यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण ९९२३ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास ३०३६ परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे ५ लाख ८५ हजार ७३६, कला शाखेचे ४ लाख ७५ हजार १३४, तर वाणिज्य शाखेचे ३ लाख ८६ हजार ७८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. व्यावसायीक अभ्यासक्रमाचे ५७ हजार ३७३ विद्यार्थी आहेत.

बारावीच्या सर्वच शाखांची परिक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च यादरम्यान पार पडली.लॉकडाऊनच्या आधी बारावीची परिक्षा संपली असली तरीही लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन यामध्ये बर्‍याच अडचणी आल्या. त्यामुळे मागच्या वर्षी २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल लागण्याला उशीर झाला आहे.

मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

1) ऑनलाईन निकालाबाबत लगेच दुसर्‍या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वत:च्या किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवारी १७ जुलै ते सोमवार २७ जुलैपर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार १७ जुलै ते बुधवार ५ ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल

2) फेब्रुवारी-मार्च- २०२० परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांतच

पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित निभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

3) फेब्रुवारी-मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

Deshdoot
www.deshdoot.com