महापालिकेत तीन हजारांवर पदे रिक्त

भरतीसाठी महापौरांचे पालकमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना साकडे
महापालिकेत तीन हजारांवर पदे रिक्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेत ( Nashik Municipal Corporation )सुमारे तीन हजारपेक्षा जास्त पदे रिक्त ( Vacancies ) आहेत. दर महिन्याला 50 पेक्षा जास्त लोक निवृत्त होतात. शासनाने अगोदर नोकरभरतीचे आदेश दिले होते. मात्र नंतर सुधारित आदेशात फक्त अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याचे निर्गमित केल्यामुळे महापालिकेतील सरसकट नोकरभरती ( Recruitment ) रखडल्याचे चित्र आहे.

असेच राहिले तर महापालिकेचा कारभार कसां चालेल, याबाबत आज महापौर सतीश कुलकर्णी यांनी बससेवा शुभारंभाच्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कळकळीची विनंती करत महापालिकेची नोकरभरती करण्याची मागणी केली आहे. महापालिकेत फिक्स पेवर नोकरभरती करण्याचे आदेश महापौर कुलकर्णी यांनी दिले होते. मात्र विशेष महासभेच्या आदेशाला 24 तास उलटत नाही तोच राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील आरोग्य व वैद्यकीय विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांकरिता भरती न करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने नोकरभर्तीचा मार्ग एक प्रकारे बंद झाला.

महापालिकेतील भाजपची एकहाती सत्ता असून हा आदेश धक्का मानला जात आहे. शासनाच्या आदेशामुळे महापालिकेत मंजूर झालेल्या अग्निशमन विभागातील 518 व बांधकाम विभागातील 223 पद भरतीलाही ब्रेक लागला आहे. प्रशासकीय कामकाजात शैथिल्य आल्याने नुकताच विशेष महासभेत सभागृहनेते कमलेश बोडके यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली होती.

सत्ताधारी भाजपसह, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेना यांनीही महापालिकेत नोकरभरती करावी असा ठराव करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर सतीश कुलकर्णी यांनी फिक्स पे वर पालिकेत भरती करण्याचा तोडगा काढला होता. त्यांसंदर्भातील ठराव प्राप्त झाला नसला तरी प्रशासनाने 24 जून 2021 चा राज्य शासनाचा आदेश बाहेर काढत, करोना परिस्थितीत आरोग्य, वैद्यकीय शिवाय कोणतीही भरती न करण्याचे सुचवले आहे.

शासनाने 645 नवीन पदांना मंजुरी देतांनाच, अग्निशमन विभागातील 311 आणि बांधकाम विभागातील तांत्रिक 223 पदांना मान्यता दिली होती. त्यामुळे जवळपास 1052 पदांना शासनाने परवानगी दिल्याने या अत्यावश्यक विभागांमधील कर्मचार्‍यांचा वनवास संपेल, असे बोलले जात होते. या पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट वगळावी यासाठी शासनाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. परंतु, शासनाच्या या आदेशामुळे वैद्यकीय विभागातील 311 वगळता उर्वरीत 741 पदांच्या भरतीलाही आता ब्रेक लागला आहे.

नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे तर मागील सुमारे एकवीस वर्षापासून नाशिक महापालिकेत पाहिजे तशी भरती झालेली नाही. यामुळे सामान्य लोकांना मनपाकडून मिळत असलेल्या सुविधांवर देखील परिणाम झाला आहे. याबाबत सभागृह नेते कमलेश बोडके यांनी त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील साकडे घातले आहे. त्यामुळे महापालिकेत नोकर भरती कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भरती न करण्याचे शासनाचे निर्देश

राज्य शासनाने पदभरती व बदली संदर्भात 24 जून रोजी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग, औषधी द्रव्य विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची पदभरती करू नये. पदभरती संदर्भात सामान्य प्रशासन व वित्तीय विभागाशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणुकीपूर्वी भरती होणार का?

नाशिक महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिकेत भरती करण्यात यावी, यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष उत्सुक आहे. निवडणुकीपूर्वी भरती झाली तर त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. मात्र राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी नोकर भरती होणार की नाही, हा मोठा प्रश्न आता पडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com