
मुंबई | Mumbai
समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) लोकार्पण झाल्यापासून दिवसाआड अपघात घडत आहे. त्यामुळे अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. तीन दिवसांपूर्वी (दि.१ जून) नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ एकाच दिवशी दोन अपघात झाल्याची घटना घडली होती. मात्र, या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती.
त्यानंतर काल (दि.३) रोजी शिर्डी ते भरवीर (Shirdi to bharvir) या समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी विचित्र अपघात झाले असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करताना बुलढाण्याजवळील मेहकरजवळ झाला आहे. याठिकाणी एका कारमधील तीन प्रवासी लघुशंकेसाठी थांबले असता त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर अपघाताची दुसरी घटना धुळ्याहून नागपूरकडे (Dhule to Nagpur) जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर घडली आहे. या महामार्गाने प्रवास करणाऱ्या एर्टिगा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन तिघांचा अपघात (Accident) घडला असून या अपघातात एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी आहेत.
तसेच अपघाताची तिसरी घटना नागपूर कॉरिडॉरवर (Nagpur Corridor) मेहकरजवळ घडली असून चेनेज २८० वर एका ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून अपघात घडला आहे. हा ट्रक बेरिअर तोडून महामार्गाच्या खाली जाऊन कोसळल्यामुळे या अपघातामध्ये चालक दिनेशकुमार तिवारी (रा.आझमगड) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे.