
नवीन नाशिक | प्रतिनिधी
एकाच शाळेतील तीन अल्पवयीन मुलींनी घरी आई रागावते व मैत्रिणींना सुद्धा भेटू देत नसल्याचा राग मनात धरत घर सोडून पलायन केलेल्या तिघा मुलींना घटनेचे गांभीर्य ओळखत अंबड पोलिसांनी अवघ्या आठ तासात शोधून त्यांच्या पालकांच्या हवाली केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तीन अल्पवयीन मुलींना एकाच वेळी पळवून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,उपायुक्त चंद्रकांत खांडवी,सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचनांनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार,उपनिरीक्षक नाईद शेख,अंमलदार नितीन राऊत,रवींद्रकुमार पानसरे,सचिन जाधव,किरण देशमुख,विनायक घुले यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार केली.
सदरहू तीनही मुली मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अडचण येत होती. संशयित सर्व ठिकानांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करीत असतांना तीनही मुली ह्या नासिकरोड रेल्वे स्टेशन येथुन जळगाव कडे जाणाऱ्या गाडीत बसुन जातांना दिसल्या. त्यानंतर जळगाव येथून परत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसतांना दिसून आल्या .
पोलीस मुलीचा शोध घेत असतांना एका मुलीने कल्याण रेल्वे स्टेशन वरील एका प्रवाशाचा फोन घेवुन तिच्या मैत्रिणीला फोन केला होता. त्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर मोबाईलचे लोकेशन हे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने अंबड पोलीसांनी कल्याण रेल्वे पोलीसांबरोबर संपर्क साधला असता कल्याण रेल्वे पोलीसांचे मदतीने तीनही मुलींना ताब्यात घेवुन बाल कल्याण समिती समोर हजर केले.अवघ्या आठ तासाच्या आत अल्पवयीन मुलींना अंबड पोलिसांनी शोधून काढल्याने मुलींच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले.