मुंबई :

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशी सूचना केली आहे. त्याला विविध राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहे.

विरोध पक्ष असलेला भाजप व मनसेचा लॉकडाऊन विरोध आहे. पण महाविकास आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्याला विरोध आहे. राष्टवादी काँग्रेसमध्ये यासाठी एकवाक्यता नाही. राष्टवादी नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो. यामुळे लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबत दिसत आहे.

लॉकडाऊनवर हा शेवटचा पर्याय- टोपे

पटेल यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे सरकारमधील मंत्री राजेश टोपे यांची वेगळी भूमिका आहे. ते म्हणतात, ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, याची चिंता राज्य सरकारला आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे गरजेचे आहे ते सगळे राज्य सरकार करत आहे. संसाधनांची कमी पडू दिली जात नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधने कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे. लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधने जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो.'

नवाब मलिकांचाही विरोध

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही लॉकडाऊनला विरोध केला होता. ते म्हणतात, ‘लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहोत.’

मनसे विरोधात

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही लॉकडाऊनला विरोध केला. ते म्हणाले, ‘लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होते असे शास्त्रीसदृषट्या सिद्ध झालेले नाही, तसे काही असेल तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगावे. गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळेस राज्य सरकार आणि सर्वसामान्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात कोरोनावर कोणते वैद्यकीय उपचार करावे लागतात, त्याच्यासाठी लागणारी संसाधने उपलब्ध आहेत, लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का?’ असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.

भाजपही विरोधात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपला लॉकडाऊनला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनासाठी चाचण्या वाढवा, काळजी घ्या पण आता लोकांनी घरी बसावे ही भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.