मादी बिबट्यासह तीन बछड्यांचा पडीक घरात आश्रय

नागरिकांची चाहूल लागताच केले पलायन
मादी बिबट्यासह तीन बछड्यांचा पडीक घरात आश्रय

सिन्नर । वार्ताहर Sinnar

मिरगाव शिवारात (Mirgaon Shivar )सायाळे रस्त्यावर एका वस्तीवरील जुन्या घरात बिबट्या मादीसह तिच्या तीन बछड्यांनी आश्रय घेतला होता. त्यांना जेरबंद करण्यासाठी शेतकर्‍यांनी जुन्या घराचा दरवाजा जेसीबीच्या सहाय्याने बंद करण्याची योजना आखली होती. मात्र, चाहूल लागताच मादीने बछड्यांसह पलायन केल्याची घटना काल घडली.

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या भागात बिबट्या मादी व बछड्यांचा वावर असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. शिर्डी महामार्गापासून जवळच मिरगाव शिवारात श्यामलाल जाजू यांची वस्ती आहे. तिथे एक जुने पडीक घर आहे. त्यात कोणीही राहात नाही. या रिकाम्या घरातून शेतकर्‍यांना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकायला आल्या. त्यामुळे शेतकर्‍यांनी वनविभागाला माहिती दिली. बिबट्या घरात लपून बसल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने वावी, मलढोण, मिरगाव परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी झाली.

गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारी मादी व बछडे यांना जेरबंद करण्याची योजना शेतकर्‍यांकडून आखण्यात आली. मादी बछड्यांसह जुन्या घरात दबा धरुन बसलेली असल्याने जेसीबीच्या सहाय्याने घराचा पुढचा दरवाजा बंद करण्यात आला. मात्र, बराच वेळ आत शांतता जाणवू लागल्याने नागरिकांनी खात्री केली असता नागरिकांची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेत मादी बछड्यांसह फरार झाल्याचे लक्षात आले.

वनविभागाने (Department of Forest )घटनास्थळी आज (दि.23) सकाळी पिंजरा लावण्याचे नियोजन केले असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांनी दिली. गेल्या 15 दिवसांपासून शेतकर्‍यांना व गुराख्यांना परिसरात मादी व बछड्यांचे दर्शन घडत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. महिनाभरापूर्वी मिरगाव फाट्यावर दोन दुचाकीस्वारांच्या अंगावर बिबट्याने झडप घातली होती. यात दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले होते. यामुळे शेतकर्‍यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com