Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रालय परिसरात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालय परिसरात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | प्रतिनिधीMumbai

मंत्रालय परिसरात सोमवारी एकाच दिवशी तीन जणांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मंगळवारी जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वारंवार खेटे घातल्यानंतरही राज्य सरकारकडून न्याय मिळत नसल्याने या महिलेनेकाल, सोमवारी दुपारी मंत्रालयाबाहेर विष घेतले होते.

- Advertisement -

शीतल गादेकर (रा. धुळे) वय ६३ असे या महिलेचे नाव आहे. विष प्राशन केलेली दुसरी संगीता डावरे ही महिला नवी मुंबईची असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान मंत्रालयाच्या गार्डन गेटवर या महिला विष प्राशन करुन पोचल्या. या दोघीही वेगवेगळ्या ठिकाणांहून आल्या होत्या.

एमआयडीसीमधील जागेबाबत फसवणूक झाल्याचा आरोप गादेकर या महिलेने केला होता. यासाठी न्याय मिळावा म्हणून तिने वारंवार मंत्रालयात खेटे घातले होते. नवी मुंबईहून आलेल्या संगीता डवरे यांच्या पतीच्या आजारपणात रुग्णालयाचा जो खर्च आला होता, यामध्ये तफावत असून फसवणूक झाल्याचा आरोप या महिलेने केला होता. पोलिसांना माहिती देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही, असा तिचा दावा आहे.

मावळच्या (जि. पुणे) रमेश माेहिते यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जनता जनार्दन प्रवेशद्वारावर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. अपंगांना मिळणाऱ्या १ हजार ५०० रुपयाच्या पेन्शमध्ये वाढ करावी, अशी त्यांची मागणी होती. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे या तिन्ही प्रकरणाचा तपास करत आहे.

काय आहे प्रकरण?

* शीतल गादेकर या महिलेच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात भूखंडआहे. हा भूखंड २०१० मध्ये एमआयडीसी अधिकाऱ्यांनी नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावे बोगस नोटरी बनवून केला. पती रवींद्र गादेकर यांच्या छायाचित्रांचा गैरवापर करत बोगस इसम उभा केला, अशी तक्रार शीतल गादेकर यांनी वारंवार राज्य सरकारकडे केली होती. तसेच सर्व संबंधितांकडे त्यांनी तक्रारी केल्या होत्या.

* शीतल गादेकर यांच्याकडून २०२० पासून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु होता. २७ मार्च रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी मागील महिन्यात राज्य सरकाला पाठवलेल्या पत्रात दिला होता. मात्र त्याची दखल घेतली नाही.

दरम्यान, शीतल गादेकर यांच्या आत्महत्या प्रकरणाबद्दल उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी मला याविषयी काही माहिती नाही. गादेकर यांचे पत्र माझ्या पाहण्यात नाही. मी याची माहिती घेतो.वस्तुस्थितीत तथ्य असेल तर चौकशी केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या