नाशिक । प्रतिनिधी Nashik

अधिव्याख्याता पदासाठी राज्य पात्रता (सेट) परीक्षा रविवारी (दि. २७) नाशिकमधील १८ केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी नाशिकमधील ८ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४९४६ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली, तर ३ हजार ६२२ विद्यार्थी गैरहजर राहिले.

महाविद्यालयांमधील अधिव्याख्याता पदासाठी सेट परीक्षा अनिवार्य आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात ही परीक्षा पार पडली. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मास्क व हातमाेजे बंधनकारण करण्यात आले होते. यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जून रोजी होणार होती. मात्र कोरोना महामारी आणि त्यामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन यामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

सेट परीक्षेचा पेपर १ हा सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखाच असतो. यावेळी या पेपरचे स्वरुपही सोपे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगीतले. १०० गुणांचा असलेल्या या पेपरमध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न होते. त्यासाठी एक तासाचा वेळ देण्यात आला होता. पेपर दोन हा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या स्पेशल विषयावर होता.

दोन तासाचा वेळ असलेल्या या पेपरसाठी २०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. हा पेपर कठीण गेल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. पेपर एकमध्ये अध्ययन, अध्यापन, संशोधन, भाषा आकलन, संज्ञापन, तर्काधिष्ठितता, आलेख, माहितीचे विश्लेषण आदी घटकांवरील प्रश्नांचे स्वरुप सोपे व विद्यार्थ्यांच्या माहितीतील असल्यामुळे हा पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.