Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट सिटी नव्हे ही तर ईस्ट इंडिया कंपनी

स्मार्ट सिटी नव्हे ही तर ईस्ट इंडिया कंपनी

नाशिक | विजय गिते | Nashik

मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या नाशिकची वाट ‘स्मार्ट सिटी’ने (Smart City) लावली आहे. ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) ज्याप्रमाणे देशाला नागवले, त्याप्रमाणे स्मार्ट सिटीही (Smart City) नाशिककरांना नागवण्याचे काम करत आहे…

- Advertisement -

स्मार्ट सिटीने नाशिक शहराचा व गावठाणाचा पूर्णता सत्यानाश केला आहे त्यामुळे नाशिककरांनी गांधी ज्योतीजवळ गांधी ज्योतीला व महात्मा गांधींना साक्ष ठेवून या कंपनी बरोबर असहकार चळवळ सुरु करावी व या कंपनीला हद्दपार करावे, असे आवाहन काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे (Shahu Khaire) यांनी केले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल दैनिक देशदूतसोबत शाहू खैरे यांनी संवाद विविध विषयांवर संवाद साधला.

स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) शहराच्या विविध भागात अनेक कामे सुरू आहेत. या कामांबाबत आपण सदस्य म्हणून अनेक वेळा सूचना केल्या. मात्र, ते त्यांच्याच पद्धतीने काम करत आहेत.

गोदावरीबाबतच (Godavari) बोलायचे म्हटले तर नदीपात्राच्या पायर्‍यांवर दगडी बांधकाम करावे, अशा सूचना केल्या आहेत. कारण या ठिकाणी गाडगे महाराज पुलाजवळ वाघाडी, गोदावरी, सरस्वती, अरुणा, वरूणा या नद्यांचा संगम होतो.

गोपालदास महाराज समाधीजवळ दगडी काम आहे. मात्र येथे फरशीच्या पायऱ्या बसवायचे काम सुरू आहे. या फरश्या पावसाळ्यात (Rain) पूर (Flood) आला तर पूर्णपणे वाहून जातील. त्यामुळे या ठिकाणी फारश्या बसविण्यापूर्वी घाट करावा,अशा सूचना केल्या. मात्र स्मार्ट,सिटीचे अधिकारी मनमानी करत आहेत.

स्नानाचे महत्व ओळखावे

गांधी तलावाला (Gandhi Talav) दगड बसविण्याचे काम सुरू आहे. तेथील पायऱ्याही तोडण्यात आल्या आहेत. गांधी तलाव हा मुळी स्नानासाठी नाहीच. हे सांगितले मात्र अधिकारी ऐकत नाही. ही जागा म्हणजे नदीपात्र आहे. तेथे सीताकुंड, लक्ष्मण कुंड, रामकुंड असून याठिकाणी खरेतर स्नानाचे महत्त्व आहे. त्यामुळे येथील घाट दगडी बांधकामाने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला फारशा बसवाव्यात.

सुग्रीवाचे एकमेव मंदिर

अहिल्यादेवी होळकरांनी दुतोंड्या मारुतीजवळ घाट बांधलेला आहे.त्या ठिकाणी सुग्रीवाचे मंदिर असून भारतातील ते एकमेव मंदिर असावे येथील पायर्‍याही तोडण्याचे काम या कामांतर्गत सुरू होते. ते थांबविले. अशी अनेक मंदिरे, समाध्या तोडण्यास वेळोवेळी विरोध केला आहे.गोदावरी पात्राजवळील पायऱ्याची दुरुस्ती करावी अशा सूचना करूनही या पायऱ्या तोडण्यात आल्या आहेत.

घाट झिगझॅग असावा

रामकुंडाच्या दोन्ही बाजूला सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे दगड काम आहे.ते दगड आता जीर्ण झाले असून त्याची दुरुस्ती न करता येथे दगडावर फरश्या बसविल्या जात आहेत. त्या फार काळ टिकणार नाही. याठिकाणी अनेक औषध विक्रेते तंबूचे बांबू टाकून व्यवसाय करतात. त्यामुळे नुकसान होणार आहे. यासाठी हा घाट झिगझॅग पद्धतीने तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून भाविकाना जाताना- येताना अडचणी येणार नाही.

मुंबईत बसून रचना

स्मार्ट सिटी कामांतर्गत पिंपळपार येथील रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून गरुड रथ जाताना मोठ्या अडचणी निर्माण होतात.तसेच पुढे सरस्वती नाला आहे त्या नाल्याची साफसफाई करणे आवश्यक आहे.या ठिकाणचे काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद या काम करत आहेत,असे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगितले जात आहे. मात्र, ज्या वास्तुविशारदाकडून रचनेची डिझाईन बनविण्यात आलेली आहे,ती त्यांनी मुंबईत बसून तयार केली आहे. त्यामुळे त्यांना नाशिकमधील भौगोलिक परिस्थितीची काय माहिती असणार?

तकलादू दीपस्तंभ

गोदावरी पात्रात दीपस्तंभ हे दगडी बांधकामात असणे आवश्यक असताना ते काँक्रिटचे बनविले जात असून ते अत्यंत तकलादू आहेत. पहिल्याच पुराच्या पाण्यात ते वाहून जातील. गरुड रथ याच पुलाखालून जातो. तेथे हे दिपस्तंभ बसविले जात होते.या दीपस्तंभामुळे रथ मार्गाला अडचण येईल, हे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले.

स्मार्ट सिटीचा अर्थ समजावून घ्या

स्मार्ट सिटीचा अर्थ असा आहे की, शहर हे स्मार्ट झाले पाहिजे आणि लोकांच्या काय गरजा आहे. त्या ओळखून त्या पद्धतीने काम करायला हवे,मात्र तसे होताना दिसत नाही.

यांना रस निधी वाढीत

67 वर्षांपूर्वी 25 हजार रुपयांमध्ये रामसेतू व गाडगे महाराज हे दोन पूल बांधण्यात आले आहे. या पुलाचे भूमिपूजन यादवराव वाघ यांनी केले आणि तत्कालीन नगराध्यक्ष मिरजकर व केंद्रीय मंत्री केसकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. हे दोन्ही पूल अजूनही उत्तम स्थितीत आहे.

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रामसेतू पुल खरोखरच जीर्ण झाला असं वाटत असेल आणि नवीन बांधायचा असेल तर ही गोष्ट नाशिककरांना अवगत करून देणे गरजेचे आहे.मात्र,तसे होत नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत काम करणाऱ्यांना चाळीस कोटी,साठ कोटी कसे वाढवायचे यातच अधिक रस आहे. मात्र,दुसरीकडे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांची काय अडचण होईल हे यांच्या लक्षात येत नाही.

अहिल्याबाई होळकर (व्हीक्टोरिया) पुलाखाली पाण्याचे गेट बसविण्यात येणार आहे.हे गेट परदेशी बनावटीचे असून परदेशातून मागविण्यात येणार आहे. मात्र, या गेट बाबत व त्याच्या निविदाबाबत यांना काहीच सोयरसुतक नाही,हेही वारंवार स्पष्ट होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या