दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी 'हा' निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी 'हा' निर्णय

पुणे । प्रतिनिधी Pune

राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान(SSC And HSC Exam ) गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवर जीपीएस प्रणालीद्वारे (GPS System )लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाने मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्यासाठी आणि आणण्यासाठी नियुक्त केलेल्या सहायक परिरक्षकाने (रनर) प्रवासादरम्यान जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक केले असून, परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथकेही नेमली जाणार आहेत.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्याच्या अनुषंगाने राज्य मंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वीय सचिवांसह पोलीस महासंचालक, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य मंडळाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, विभागीय मंडळ अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत या दृष्टीने शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रावर नेमल्या जाणार्‍या भरारी पथकांशिवाय जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातून भरारी पथके आणि बैठी पथके नियुक्त केली जाणार आहेत. तसेच मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्यासाठी आणि आणण्यासाठी नियुक्त केलेल्या सहायक परिरक्षकाने (रनर) प्रवासादरम्यान जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक केले आहे, असे ओक यांनी स्पष्ट केले.

परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

राज्य सरकारने शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने राज्यातील कर्मचार्‍यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाने दिला आहे. दरम्यान, प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या सोमवारी (13 फेब्रुवारी) शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे. महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी ही माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com