नाशिक | प्रतिनिधी

नांदूरमध्येश्वर वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या चाैथ्या मासिक पक्षी प्रगणनेत ३१ हजार ९०२ पक्षी आढळून आले आहेत. मार्श हंरियर, ऑस्ने, उघडया चोचीचा बगळा, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, गढ़वाल, चमचा, कमळपक्षी, शेकाटया, नदी सुरय, पाकोळी पक्षी आदी पक्षी आढळून आले आहेत...

तालुक्यातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव अशा ७ ठिकाणी केलेल्या पक्षी निरीक्षण प्रगणनेत विविध पाणपक्षी व झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या. एकूण ६६ प्रजातींचे २७ हजार ४४ पाणपक्षी, झाडांवरील ४ हजार ८५८ पक्षी व गवताळ भागातील काही पक्षी अशा एकूण ३१ हजार ९०२ पक्षांची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक वनविभागाने नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात डिसेंबर २०२० महिन्यातील व हंगामातील ४ थी मासिक पक्षी प्रगणना बुधवारी (दि. ३०)केली. सकाळी सात ते साडेदहा आणि सायंकाळी तीन ते पाच या वेळेत वनाधिकारी, कर्मचारी, स्थानिक गाईड, पक्षिमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक याच्या मदतीने ही गणना पूर्ण करण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रगणना करण्यात आली. थंडी वाढत असल्याने क्रेन आणि चित्रबलाक पक्ष्यांची संख्या वाढत आहे. कराेनामुळे पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिण सुविधा सध्या बंद आहे. त्यामुळे पर्यटकांनी स्वतःची दुर्बिन, स्कोप इ. सोबत बाळगणे आवश्यक आहे, असे वन विभागाने म्हटले आहे.

पक्षी प्रगणना सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव नांदूरमध्यमेश्वर भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे, वनपाल अशोक काळे, वनरक्षक आशा वानखेडे, पक्षिमित्र दत्ताकाका उगावकर, डॉ. डेलें, प्रा. आनंद बोरा, अनंत सरोदे, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी नाशिकचे प्रतिक्षा कोठूळे,

पूजा शिर्के, नूरी मर्चंट, चंद्रिका खैराने, किरण बेलेकर, राहुल वडघुले तसेच अभयारण्यातील गाईड अमोल दराडे, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, ओंकार चव्हाण, विकास गारे, वनकर्मचारी डी. डी. फापाळे, गंगाधर आघाव, सुनिल जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, प्रकाश गांगुर्डे यांनी पूर्ण केली.