Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानायलॉन मांजाने घेतला 13 पक्ष्यांचा बळी

नायलॉन मांजाने घेतला 13 पक्ष्यांचा बळी

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

नाशिक शहरात संक्रांतीपासून आजपर्यंत तब्बल 30 पक्षी नायलॉन मांजामुळे(Nylon Manja) गंभीर जखमी झाले असून त्यातील 13 पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यातील काही पक्षांच्या पंखांना गंभीर इजा झाल्याने ते आयुष्यभरासाठी जायबंदी झाले आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरात पोलीस आयुक्तांनी नायलॉन मांजाला प्रतिबंध घालत विक्री,वापर किंवा जवळ बाळगण्याला बंदी घालण्यात येऊन ठिकठिकाणी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करत लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला.तसेच विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची मजा लुटण्यासाठी ठिकठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला होता.

संक्रांतीपासून ते आजपर्यंत इको एको फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने सुमारे 30 पक्षी त्यांमध्ये घार,घुबड,पोपट आदी पक्ष्यांच्या पंखांमध्ये नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणावर अडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते.यातील काही पक्षी जास्त जखमी झाल्याने ते गतप्राण झाले होते तर काही पक्ष्यांच्या पंखाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने ते आयुष्यभर उडू शकणार नाहीत. इको एको फाउंडेशनच्या वैभव भोगले,अभिजित महाले,अरुण अय्यर,अमित लवाळे,आयुष पाटील,शर्ली रेखी,शंतनु पवार,सिध्दी पंचार्य,सागर पाटील,समर्थ महाजन,पुजा लढ्ढा,वृषाली वैद्य,वेणूका महाजन,ऋत्विक पाटील आदींच्या टिमने शहरातील विविध भागांतून जखमी पक्षी आणून पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील केल्या.

नायलॉन मांजा उत्पादकांवरच कारवाई व्हावी

नायलॉन मांजाचा वापर करू नये याकरिता पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली, मात्र तरीही नागरिकांमध्ये त्याबाबत जनजागृती अद्यापही झाली नसल्याचे जखमी पक्ष्यांची अवस्था बघून लक्षात येते. यापुढे पोलीस प्रशासनातर्फे विक्रेत्यांवर कारवाई सोबतच नायलॉन मांजा बनविणार्‍यांवर थेट कारवाईचा बडगा उचलला पाहिजे अशी पक्षी प्रेमींची मागणी आहे.

घुबडाला जीवदान

वडाच्या झाडावर नायलॉन मांजा मध्ये अडकून घुबड पक्षी जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत घुबडाला अग्निशमन दलाच्या जवानांनी लाकडी बांबूच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. नवीन नाशकातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरा जवळील एका वडाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घुबड पक्षी अडकल्याची माहिती तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली होती. यावेळी अग्निशमन दलाचे रवींद्र लाड. रविंद्र आमले , वाहन चालक इस्माईल काझी त्वरित घटनास्थळी दाखल होत संजय गाडेकर यांनी झाडावर चढून बांबूच्या मदतीने नायलॉन मांजा मध्ये अडकलेल्या घुबडाला सुखरूप पणे बाहेर काढून उपचारासाठी प्राणी मित्र यांच्याकडे सोपविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या