
नाशिक । प्रतिनिधी Nashik
घरमालक, भाडेकरूंनी धोकादायक इमारती, घरे, वाडे स्ट्रक्चरल कन्सल्टंटची मदत घेऊन उतरवून घ्याव्या अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे कलम 268 नुसार पोलिसांच्या मदतीने इमारती मोकळ्या केल्या जातील, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरे स्वतःहून उतरवून घेण्याच्या सूचना महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमार्फत घरमालक, भाडेकरूंना पाठविल्या जातात. यातून भविष्यात कायदेशीर अडचणीत सापडू नये, याची तजवीज असते. परंतु, यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धोकादायक इमारती उतरवून घेण्याच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मालक किंवा भाडेकरूंनी स्वतः न उतरविल्यास पोलीस बंदोबस्त लावून मिळकती उतरविल्या जातील व त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशाराच देण्यात आला आहे.
शहरात एक हजारांहून अधिक धोकादायक इमारती व वाडे आहेत. बहुतांश वाडे जुने नाशिक व पंचवटी भागात आहेत. वाडे ढासळण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास महापालिकेचे अधिकारी नोटीस बजावण्याचे कारण देवून हात वर करतात. आर्थिक नुकसान किंवा जागेवरील दावा जाईल म्हणून तेथे राहणारे घर सोडत नाही. परंतु महापालिकेने आता वाड्याबाबत ठोस धोरण स्वीकारले आहे.