
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Maharashtra University of Health Sciences )आस्थापनेवर शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आलीे. विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत कुठल्याही परिक्षार्थी उमेदवाराने परीक्षा कालावधी दरम्यान डमी अथवा बोगस उमेदवार परीक्षेस बसणे किंवा परीक्षेत गैरप्रकाराकरता कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापर केल्याचे आढळून येत नाही, असा निर्वाळा परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिला.
विद्यापीठाच्या भरती प्रक्रिया परीक्षेबाबत प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीकडून त्याबाबतची निरिक्षणे प्राप्त झाली असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.
विद्यापीठास आरोग्य विज्ञानाच्या विविध अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव असून परीक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, केंद्र निरीक्षक, अंतर्गत दक्षता पथक व भरारी पथक अशी यंत्रणा नेमण्यात आली होती. त्यामुळे तक्रारीत नमूद घटना घडणार नाही याची विद्यापीठाने योग्य ती खबरदारी घेतली होती. डमी अथवा बोगस उमेदवार परीक्षेस बसणे, परीक्षेत गैरप्रकार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होणे याबाबतच्या तक्रारी या टप्प्यावर ठोस पुराव्यांअभावी सिध्द होत नाहीत, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करताना त्यांच्याविरुध्द कुठल्याही पोलीस ठाण्यात फौजदारी स्वरुपाचा व विशेषतः कुठल्याही परीक्षेत गैरकृत्य केल्याबाबतचा गुन्हा नोंद नसल्याचे किंवा प्रलंबित नसल्याचे हमीपत्र देण्याच्या अधीन राहून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावा. ही हमीपत्रातील माहिती कोणत्याही स्तरावर खोटी असल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करुन सेवा खंडित करण्याचा विद्यापीठास अधिकार असेल. याबाबततची अट नियुक्ती पत्रात नमूद करावी, तसेच नियुक्ती आदेशानुसार संबंधित पदावर रुजू होताना पोलीस यंत्रणेमार्फत दिला जाणारा चारित्र्य पडताळणी दाखला घेण्यात यावा, असेही चौकशी समितीने म्हटले आहे.