Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा रुग्णालयात ‘ट्रॉमा सेंटर’ची नितांत गरज

जिल्हा रुग्णालयात ‘ट्रॉमा सेंटर’ची नितांत गरज

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी खासगी प्रवासी बस आणि ट्रक अपघातात 12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जखमींवर जिल्हा रुग्णालयात ( District Hospital Nashik ) तातडीचे उपचार करताना अनेक उणिवा अधोरेखित झाल्या. जखमींचे प्राण वाचवण्यासाठी व आवश्यक शस्त्रकिया करण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्रींची जिल्हा रुग्णालयात कमतरता जाणवली. तरीसुद्धा तेथील डॉक्टर आणि त्यांच्या सहायक सेवकांनी केलेले शर्थीचे प्रयत्न कौतुकास्पद होते. तथापि आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात ‘ट्रॉमा सेंटर’ ( trauma center )होण्याची गरज प्रकर्षाने जाणवली.

- Advertisement -

बस-ट्रक अपघात होऊन बस पेटून काही प्रवाशी मृत्यमुखी पडल्याचा तर काही प्रवाशी गंभीर भाजल्याचा फोन अस्थिरोगतज्ञ रिटायर मेजर डॉ. गोपाळ शिंदे यांना आला. त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. डॉ. शिंदे रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांचे सहकारीही हजर झाले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डीन मेजर जनरल सुशीलकुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी रुग्णांवर उपचार सुरू करून बचाव कार्य सुरु सुरु झाले. घाबरलेल्या रुग्णांना मनोधैर्य देताना सर्व प्रक्रिया पुर्ण करणे डॉक्टरांच्या पथकापुढील सर्वात मोठे आव्हान होते. अपघातात १८ जणांचे हाड मोडले. काही जणांवर तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. उपलब्ध सोयी-सुविधांचा वापर करून रुग्णांवर यशस्वी उपचार करताना डॉक्टरांची दमछाक झाली.

शनिवारची आपत्कालीन परिस्थिती सोडली तर जिल्हा रुग्णालयात यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत जखमी रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. मात्र अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे येथील डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. जिल्हा रुग्णालयात नाशिक शेजारील जिल्हे व गुजरातमधील काही गावांतूनदेखील रुग्ण येतात. जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ असते तर कितीही मोठी दुर्घटना घडली त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सदैव सज्ज राहता येऊ शकेल. जिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय सुविधादेखील उपलब्ध नाही. आपत्कालीन परिस्थितीत जखमी व्यक्ती घाबरून गेलेली असते.

अशावेळी जखमींचे मनोधैर्य खचू न देणे व उपचारासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री तयार असणे केवळ ट्रॉमा सेंटरमुळे शक्य होईल. पुढील काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. काही वर्षांपूर्वी नाशकातील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडून अनेक भाविकांचा जीव गेला होता तर कित्येक जखमी झाले होते. त्यावेळीसुद्धा जिल्हा रुग्णालयाची जखमींना उपचार सुविधा पुरवताना बरीच दमछाक झाली होती. तो अनुभव जमेस धरता ट्रामा केअर सेंटरची आवश्यकता सतत जाणवते. नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपचे तीन आमदार आहेत. त्या सर्वानी मिळून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले तर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातील सर्वसोयींयुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ आकारास येऊ शकेल.

संधी उपलब्ध

जिल्हा रुग्णालयात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवीचा विभाग अलीकडेच सुरु झाला आहे. त्यामुळे ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या विभागाअंतर्गत विद्यापीठाला पदव्युत्तर पदवीचे मट्रॉमा केअर सेंटर दिले गेल्यास निष्णात डॉक्टरही तयार होतील व रुग्णांना त्यांची सेवाही मिळू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या