सप्तशृंगीगडावर चोरीचा प्रयत्न? सीसीटीव्हीला 'चुना', दानपेटीतील नोटा जळालेल्या अवस्थेत

नेमकं प्रकरण काय?
सप्तशृंगीगडावर चोरीचा प्रयत्न? सीसीटीव्हीला 'चुना', दानपेटीतील नोटा जळालेल्या अवस्थेत

सप्तशृंगीगड | इम्रान शाह | Saptashrungi Gad

साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात असलेल्या विविध दानपेट्यांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर दान करतात...

संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर असते. तरीसुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यालाच 'चुना' लावून एका दानपेटीतील पैशांची अफरातफार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दानपेटीतील नोटा जळालेल्या अवस्थेत दिसून आल्या. याशिवाय दानपेटीतील काही रकमेची चोरी झाल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

आज सकाळी या प्रकाराची वाच्यता होताच भाविकांमध्ये खळबळ उडाली. दानपेटीतील काही नोटा जळालेल्या अवस्थेत आढळल्या. तसेच येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दर्शनी भागास चुना लावल्याची चर्चा भाविकांमध्ये सुरू आहे.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी याप्रकरणी विश्वस्तांकडे विचारणा केली असता याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला आहे. सप्तशृंगीदेवी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. आई भगवतीच्या श्रध्देपोटी लाखो रूपयांचे दान भाविक दानपेटीत टाकतात. मात्र अशा प्रकारची घटना घडल्याने 'झारीतील शुक्राचार्य' कोण? अशी चर्चा सप्तशृंगीगडावर सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सप्तशृंगीगडावर चोरीचा प्रयत्न? सीसीटीव्हीला 'चुना', दानपेटीतील नोटा जळालेल्या अवस्थेत
वणी : दगडाने ठेचून एकाचा निर्घुण खून

सप्तशृंगीगडावर दानपेटीतून चोरीबाबत देवी संस्थानच्या अध्यक्षांना पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. घडलेली घटना निंदनीय असून याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

- दीपक पाटोदकर, विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट.

येथे चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. आमच्याकडे सीसीटीव्ही टेक्निशियन नाही. सर्व प्रकारचे फुटेज मिळवून संबंधित व्यक्तीवर लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- सुदर्शन दहातोंडे, ट्रस्ट व्यवस्थापक, सप्तशृंगी निवासिनी देवी.

सप्तशृंगीगडावर लाखो रुपये खर्च करून सुरक्षा एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षारक्षक असूनही असा प्रकार घडत असेल तर भाविकांनी दान म्हणून दिलेल्या पैशांची ही उधळपट्टीच आहे.

- भालचंद्र कानडे, ग्रामस्थ, नांदुरी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com