
नाशिक । प्रतिनिधी Nashik
मागील पाच वर्षात नाशिक महापालिकेत ( NMC ) भारतीय जनता पक्षाची ( BJP ) एकहाती सत्ता होती तर 13 मार्च 2022 पासून नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट ( Administrative Rule )सुरू झाली आहे.
यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यात एकप्रकारे नाशिक महापालिकेचा कारभार गेल्यामुळे गत पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध अनागोंदी कामांची चौकशीसाठी आता सरकारने पुढाकार घेतला असून लवकरच राज्य शासनाचे पथक नाशिक महापालिकेत येऊन विविध कामांचा आढावा घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. विविध आर्थिक बेशिस्तीच्या तक्रारी आल्याने राज्य शासनाकडून महापालिकेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती तयार करण्यात आली असून ती समिती येऊन माहिती घेणार आहे.
दरम्यान, अशा चौकशीसाठी महापालिकेच्या प्रशासनाकडून मात्र शासनाला कुठलीही शिफारस झालेली नसल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गत 5 वर्ष महापालिकेत भाजपची सत्ता होती,भाजपच्या कामकाजावर टीका करतांना शिवसेनेसह विविध पदाधिकार्यांतर्फे अनेकदा शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या कामकाजावर टीका करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेत येऊन कामकाजाचा आढावा घेतला होता.