नोटप्रेसमधील चोरीचा तपास लागला

नोटप्रेसमधील चोरीचा तपास लागला

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

राज्यभरात गाजलेल्या नाशिक रोड येथील नोट प्रेसमधून ( Currency Note Press at Nashik Road ) चोरीस गेलेल्या पाच लाखांच्या नोटांच्या बंडलचा तपास उपनगर पोलिसांनी ( Upnagar police station )अल्पावधीतच लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाच लाख रुपये चोरीस गेले नव्हते तर कामाच्या लोडमध्ये कटपॅक सेक्शनमधील दोन सुपरवायझरकडून पंचिग झाल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनी प्रेस व्यवस्थापनाला लेखी पत्र देऊन चुक कबूल केली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसिद्धपत्रकाव्दारे सांगितले.

उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाचा आशय असा- सहा महिन्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारीत प्रेसमधून पाच लाखांच्या पाचशेच्या नोटांचा बंडल चोरीस गेल्याची तक्रार 13 जुलैला उपनगर पोलिस ठाण्यात प्रेस व्यवस्थापनाने दाखल केली होती. प्रेसने सहा महिने अंतर्गत तपास केल्यानंतरही माग लागला नव्हता.

पोलिसांनी तपासा दरम्यान संबंधित विभागातील अधिकारी व कामगारांकडे चौकशी सुरु करूनही काहीच माहिती सुरवातीस हाती लागत नव्हती. पोलिसांनी नोटा छपाईची सर्व प्रक्रिया माहित करून घेतली. हा बंडल शेवटी कोणाच्या निदर्शनास आला याची माहिती घेतली. प्रेसमधील कटपॅक सेक्शन व पॅकिंग सेक्शनचे रेकार्ड तपासले. त्यावरून चोरीस गेलेला बंडल 12 फेब्रुवारीला तपासणीसाकडून तपासला गेल्याचे दिसले. परंतु, त्याबाबत निश्चितता होत नसल्याने बंडलचा फुल पार्सल फोडून तपासणी केली असता सदर ठिकाणी दुसराच बंडर चेक केल्याचे दिसून आले.

या ठिकाणी सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंड बाहेर जाणे शक्य नव्हते. सर्व कामगारांची संपूर्ण झडती जाताना व येताना करण्यात येते. पोलिसांनी कामगारांना विश्वासात घेतले. तरीही ठोस माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी सुपरवायझरला लक्ष्य करून त्यांचे रेकार्ड तपासले. त्यात कटपॅकच्या दोन सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी खरी माहिती देण्यासाठी वेळ मागितला. पोलिस कारवाईच्या भितीने 24 जुलैला त्यांनी स्वतःहून व्यवस्थापनाला कबुली जबाब दिला. त्यांनी हा नोटांचा बंडल चोरीस गेलेला नसून कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला व व्यवस्थापन कारवाई करेल या भितीने ही गोष्ट कोणास सांगितली नसल्याचे लेखी सांगितले.

या कबूली जबाबाची खात्री केल्यावर वर्कमॅमनच्या तपासात दुजोरा मिळाला. पोलिसांनी कटपॅक सेक्शनमधील स्ट्रांग रूम तसेच रेकार्ड रजिस्टर, स्टार नोटांचे रजिस्टर यांची बारकाईने तपासणी केली. त्यामुळे धागे सापडत गेले. सुपरवायझरच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना याची माहिती होती काय याचा तपास सुरु आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त दिपक पाण्ड्ये, उपायुक्त विजय खरात, सहआयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव, सहाय्यक निरीक्षक संतोष खडके, अजिनाथ बटुळे, सुधीर आव्हाड, सुदर्सन बोडके, रतनसिंग नागलोथ यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com