काम आशादायी, मोबदला निराशादायी

आरोग्य सुविधा पुरवणार्‍या आशा सेविकांची उपेक्षाच
काम आशादायी, मोबदला निराशादायी

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत (National Rural Health Mission )ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आशा सेविकांचे ( Aasha Workers )काम आशादायी असले तरी त्यांंंना मिळणारा मोबदला अतिशय निराशादायी आहे. रोज वीस घरांना भेटी व 20 प्रकारची कामे करूनही 70 रुपये रोजावर समाधान मानावे लागत आहे.

ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये अशा या मध्यस्थाचे काम करतात. गैरआदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक अशा नियुक्त आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात 3600 व शहरी भागात दीड हजार सेविका कार्यरत आहेत. लोकांना स्वच्छता, लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे, ताप, हगवण, लहान-मोठ्या जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे, इतरही गोळ्यांचे वाटप करण्याची कामे आशांमार्फत केली जातात.

आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही असते. ग्रामीण महिलांना सुखरूप प्रसूती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेंद्रीयाशी संबंधित जंतुसंसर्ग, लैंगिक संबंधातून होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी या बाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असतात. ग्रामीण भागातील या स्वयंसेवक पद्धतीने जरी काम करत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना आजही दरमहा दोन हजार रुपयेेच मानधन मिळते.

आशा सेविका त्यांचे काम खूप चांगल्या पद्धतीने करतात. एवढ्या कमी मानधनातही त्या जबाबदारीने सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या कार्याची गेल्याच आठवड्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही स्तुती केली होती. त्यांच्या कामाने त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंंत मान निशिचतच मिळाला आहे. मात्र धनाबाबत कोणीही बोलत नाही. त्यामुळे 2005 पासून आजपयर्ंंत त्या कामच करत आहेत.

शेवटच्या टप्प्यापर्यंत 78 सेवा

कुटुंबकल्याण प्रचार, सॅनिटरी पॅड, गर्भनिरोधकाचे वाटप मोफत/माफक दरात करणे.

साध्या आजारावर उदा. ताप, खोकला यावर प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरवणे व औषधोपचार करणे.

प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, आहार इत्यादीबाबत माता व बाल आरोग्याविषयी प्रबोधन करणे.

गावपातळीवर आरोग्य नियोजन करण्यात सहभागी होणे व अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका/सेविका यांच्यासह विचारविनिमय करणे.

प्रत्येक जन्माची व उपजत मृत्यूची नोंद ठेवणे, आपण केलेल्या कामाची रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवणे इत्यादी आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण नोंद ठेवणे.

अशा प्रकारच्या आरोग्यविषयक 78 सेवा आशा स्वयंसेविका ग्रामीण पातळीवर शेवटच्या टप्प्यापर्यंत पुरवत असतात.

अतिशय तटुपुंज्या मानधावर वर्षनुवर्षे आशा काम करत आहेत. त्यांच्या मानधनवाढीसाठी वर्षातून चारवेळा तरी निश्चित आंदोलन होते. प्रत्येक वेळी आश्वासनाची खैरात केली जाते. मात्र अंमंलबजावणी कासवगतीने होत आहे. केवळ गावात ताई म्हणून मान मिळतो, शासकीय पातळीवर ओळखी राहतात. म्हणून आशा मोठ्या आशेने कामे कारतात. त्यांंची शासनाने योग्य दखल घेणे गरजेचे आहे.

माया घोलप, आशा कर्मचारी संघटना.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com