
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
रेल्वेने ( Railway )खतांसाठी ( fertilizers) नाशिकरोडचे रेल्वे मालधक्का गोदाम(Warehouse ) आरक्षित ठेवावे, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांना रेल्वे अधिकारी व रेल्वे मालवाहतूकदारांनी प्राधान्य द्यावे, खतांचे रेक वेळेत खाली करण्याबाबत कामगार उपायुक्तांनी माथाडी कामगारांना आदेश द्यावेत, अशा सूचना आज जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी दिल्या.
जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेव्दारा खतांचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी नाशिकरोडच्या रेल्वे मालधक्क्याची पाहणी केली. खतांचे रॅक कमी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी रेल्वे अधिकार्यांशी चर्चा केली. मालधक्क्याचे मुख्य माल पर्यवेक्षक कुंदन महापात्रा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे,कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे व मोहीम अधिकारी अभिजीत जमधडे, जिल्हा पुरवठा अधिकारी नर्सिकर, कामगार उपायुक्त विविक माळी, विविध खत कंपनी प्रतिनिधी अनावकर, एन. एन. पवार, एन. आर. जांभूळकर, रेल्वे ट्रान्सपोर्टर आनंद शम्मी आदी उपस्थित होते. पावसाचे आगमन झाले असतानाही शेतकर्यांना खतांचा तुटवडा भासत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मालधक्क्यावर आले. येथे रेल्वेने महिन्याला सिमेंटचे 40 ते 45 रॅक (मालगाड्या) येतात. मात्र, खतांचे पाच ते नऊच रॅक येतात. मालधक्क्यावर किती जागा उपलब्ध आहे याची माहिती घेत जिल्हाधिकार्यांनी कुंदन महापात्रा यांच्याशी चर्चा करून पुढील दोन महिने खताचे रॅक मागविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली. महापात्रा यांनी सिमेंटच्या कंपन्या माल जास्त मागवत असल्याने त्यांचे रॅक जास्त येत असल्याचे सांगितले. खतांचे रॅक वाढवायचे असेल तर स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार नाही.
रेल्वेचे भुसावऴ विभागाचे मुख्य व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करावा, असे महापात्रा म्हणाले. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांना कंपनीला दिलेल्या आवंटनाप्रमाणे खतांचा पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी सूचना दिली. कृषी विभागाने ज्यादा दराने खत विक्री करणार्या तसेच लिंकिंग करणार्या कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले.