नवीन रिंगरोडमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार

कुंभमेळ्यापूर्वी तयार करण्याच्या हालचाली गतिमान
नवीन रिंगरोडमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार

नाशिक । फारुक पठाण Nashik

नाशिक शहराचा झपाट्याने विकास ( Development of Nashik City )होत असताना परराज्यातील लोक नाशिकमध्ये स्थायिक होण्याची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनसंख्यादेखील वाढत आहे. म्हणून कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमध्ये आणखी एक नवीन रिंगरोड (Ring Road) तयार करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 60 किलोमीटर लांब हा नवीन रिंगरोड राहणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विशेष लक्ष देत आहेत. नवीन रिंगरोड तयार झाल्यावर शहरातील वाहतुकीचा प्रश्न काहीसा मार्गी लागणार आहे.

2017 मध्ये नाशिकमध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. एकीकडे नमामि गोदा प्रकल्प सल्लागार नेमणूक शेवटच्या टप्प्यात आहे, तर दुसरीकडे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन विविध प्रकारच्या सूचना करत आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहरात नव्याने तब्बल 60 किलोमीटर लांबीचा नवीन बाह्य रिंगरोड तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही मनपा आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले आहेत.

नवीन रिंगरोड जलालपूरपासून सुरू होऊन एकूण 60 किलोमीटर फिरून पुन्हा जलालपूरपर्यंत येणार आहे. त्याला नवीन बाह्य रिंगरोड असे नाव सध्या देण्यात आले आहे. महापालिका प्रशासन या रोडसाठी प्रयत्न करणार असून कुंभमेळ्यापूर्वी साधारण चार वर्षांत हा नवीन रिंगरोड तयार करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र त्यासाठी निधीची गरज असल्यामुळे महापालिका शासनाचा दरवाजा ठोठावणार आहे. सध्या काही भागांमध्ये या रिंगरोडचा काही भाग 30 मीटरप्रमाणे असला तरी तो 60 मीटरपर्यंत करावा लागणार आहे.

शासनाकडून निधीसाठी प्रयत्न

हा नवीन रिंगरोड तयार झाल्यावर शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण हलका होऊन वाहतूककोंडीदेखील कमी होणार आहे. त्याचप्रमाणे जगभरातून येणार्‍या भाविकांनादेखील सर्व गावात फिरता येणार आहे. त्याचप्रमाणे मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला ज्या जागा पार्किंगसाठी होत्या त्यातील बर्‍याचशा ठिकाणी बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने आता पार्किंगसाठी नव्याने जागा शोधण्याचे काम हाती घेतले आहे. नाशिक महापालिकेत सध्या निधीची कमी आहे. त्यामुळे शासनाकडून काही निधी मंजूर करता येणार आहे का? याबाबतदेखील महापालिका आयुक्त प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नव्या रिंगरोडसाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत. हा पैसा शासनाकडून घेण्याची तयारी मनपाची असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com