द्वेषपूर्ण भाषणांच्या प्रवृत्ती दुर्दैवी

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
द्वेषपूर्ण भाषणांच्या प्रवृत्ती दुर्दैवी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोहोचलो आहोत अशी टिपण्णी करत देशातील द्वेषयुक्त भाषणांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चिंता व्यक्त केली आहे.जातीय आधारावर प्रक्षोभक वक्तव्य करणारी व्यक्ती कोणत्याही धर्मातील असो, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारला व पोलिसांना अशा विधानांची दखल घेऊन स्व:ता गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.शाहीन अब्दुल्ला यांनी देशातील द्वेषपूर्ण भाषणे आणि दाखल असलेल्या गुन्ह्यांची नि:पक्षपाती चौकशी करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला द्यावे. ही मागणी करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, युएपीए (दहशतवादी कारवायांना प्रतिबंध) कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, असेही याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने म्हटले की, द्वेषपूर्ण भाषणांबद्दल आम्ही गंभीर आहोत. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. द्वेषपूर्ण भाषणे करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आपल्या संविधानात कायदे करण्यात आले आहेत. मात्र, तरी सुद्धा कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही.

द्वेषपूर्ण भाषणांच्या प्रवृत्ती अत्यंत दुर्दैवी आहेत. संविधान वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्याबद्दल सांगते. परंतु धर्माच्या नावाखाली करण्यात येणारी द्वेषयुक्त भाषणे हे दुःखद आहे.

- सर्वोच्च न्यायालय

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com