Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यादुष्काळाची छाया गडद

दुष्काळाची छाया गडद

पुणे । प्रतिनिधी Pune

संपूर्ण राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांबरोबरच सर्वांची चिंता वाढली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. यामुळे मोठ़या प्रमाणात अवर्षणाची स्थिती निर्माण झाली असून, तूट सरासरीच्या उणे 57 टक्के इतकी झाली आहे. दुसरीकडे सर्व जिल्ह्यांची स्थितीही बिकट असून, दुष्काळाच्या उंबरठ़यावर हे जिल्हे आहेत.

- Advertisement -

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट आहे. यात अवर्षण ते दुष्काळापर्यंत काही जिल्ह्यांची अवस्था आहे. 1 ते 29 ऑगस्टपर्यंतची आकडेवारी पाहता पालघरमध्ये सरासरीच्या उणे 65, मुंबई उपनगर उणे 66, मुंबई शहर उणे 77, ठाणे उणे 50, रायगड उणे 57, रत्नागिरी उणे 48, सिंधुदुर्ग उणे 51, कोल्हापूर उणे 58, सांगली उणे 80, सातारा उणे 63, पुणे उणे 58, नगर उणे 81, नाशिक उणे 50, सोलापूर उणे 85, नंदुरबार उणे70, धुळे उणे 63, जळगाव उणे 61, औरंगाबाद उणे 67, बीड उणे 83, उस्मानाबाद उणे 86, नागपूर उणे 40, चंद्रपूर उणे 51, अमरावती उणे 74, यवतमाळ उणे 55, गडचिरोली उणे 27 टक्के पाऊस झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 41 गावात अद्याप पेरणी ही झाली नाही, तर जिल्ह्यातील इतर भागात पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. तर 44 महसुली मंडळ अशी आहेत, ज्या भागात गेल्या 21 दिवसांपासून एक थेंबही पावसाचा बरसलेला नाही. त्यामुळे नजीकच्या भविष्यात शेती पिकांसह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मान्सून परतीच्या वाटेवर?

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा असताना मान्सून 5 किंवा 8 ऑक्टोबरपासून परतीच्या वाटेवर लागणार असल्याची चर्चा आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही. सध्याची परिस्थिती बघता परतीच्या पावसाबद्दल आम्ही कुठलाही अंदाज बांधलेला नाही. परतीच्या पावसाची सुरुवात ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, सध्या तरी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकर्‍यांसाठी फायद्याचा ठरू शकेल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता

पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भ वगळता इतरत्र पावसाने ओढ दिली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात थोडाफार पाऊस झाला. मात्र पोषक स्थितीअभावी इतरत्र मात्र पाऊस झालाच नाही. पुढील आठवडाभर कोणतीही पोषक स्थिती पावसासाठी निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्यभर हलक्या ते अतिहलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

पाणीसाठ्यात घट

राज्यातील धरणसाठ़यात मोठ़या प्रमाणात घट झाली आहे. सध्या हा पाणीसाठा 64.69 टक्के इतका आहे. पावसाअभावी पाणीसाठ़यात म्हणावी तितकी वाढ झाली नाही. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 83.88 टक्के इतका होता. यात सर्वात कमी औरंगाबाद विभागात 31.51 टक्के, तर नागपूर 78.16, अमरावती 70.39, नाशिक 60.71, पुणे 70.44, कोकण 89.86 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, 1 जून ते 29 ऑगस्टची आकडेवारी पाहता उणे 8.68 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. तसे घडल्यास राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट गडद होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात दुष्काळ जाहीर करुन त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 29% पाऊस ठराविक ठिकाणी झाला आहे. सद्यःस्थितीत 329 महसुली मंडळात पावसाचा 23 दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील 18 जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे.

सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. तिथे सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्यातील बर्‍याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास 70 टक्के पिके शेतकर्‍यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. शेतकर्‍यांनी पेरणी करीता, बियाणे – रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या खर्चाचा परतावा परत मिळेल का नाही अशी शंका जयंत पाटील पत्रात उपस्थित केली आहे.

खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून चारा पिकांचे देखील नुकसान झाले आहे. जनावरांच्या चार्‍याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना पशुधन वाचवण्याचे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पावसाअभावी सिंचनासाठी कालव्यांना आवर्तने सोडण्यासाठी धरणांत पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही. तसेच यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच राज्यात आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या