सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तींप्रमाणे - देवेंद्र फडणवीस

सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तींप्रमाणे  - देवेंद्र फडणवीस

मुंबई । Mumbai

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना १६४ मते मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी देखील त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले...

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्राने एक नवीन विक्रम केला असून विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. तसेच ते देशाच्याही इतिहासातील सर्वात तरूण अध्यक्ष आहेत.तर या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका ही एका न्यायमूर्तींप्रमाणे आहे. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. हे कठीण काम आहे. ज्याच्या बाजूने निर्णय येतो त्याला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय वाटतो. पण एका गोष्टीच्या दोन बाजू असतात असे आपण म्हणतो. एक खरी एक खोटी, पण असे नाही एक त्यांची एक आमची बाजू असते. पण एक तिसरी बाजू असते ती खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचे काम हे अध्यक्षांना करावे लागते, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, या सभागृहाच्या अध्यक्ष स्थानाला एक विशेष महत्व आहे. हे कायदेमंडळ आहे. या ठिकाणी वेगवेगळे कायदे आपण करतो आणि विशेषता आपल्या विधानमंडळाची रचना अशी आहे, की गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो, नंदुरबारचा शेवटचा माणूस असो की अगदी कर्नाटक, गोव्याच्या सीमेवरचा शेवटचा माणूस असो, प्रत्येकाच विचार त्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या सगळ्या या सभागृहात या सदस्यांच्या माध्यमातून प्रतिध्वनित होतात आणि छोट्याती छोटा प्रश्न देखील सोडवण्याची क्षमता आणि मोठ्यातील मोठी अडचण देखील क्षमता या सभागृहात आहे. म्हणून मला असे वाटते की या सभागृहाचे अध्यक्ष होणे, हा देखील एक अत्यंत भाग्याचा असा योग आहे, जो तुम्हाला लाभला याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. असेही फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आज हा देखील एक योगायोग असेल की वरच्या सभागृहातील सभापती आणि खालच्या सभागृहाचे अध्यक्ष यांचे नाते हे सासरे आणि जावायचे आहे. पण पुलं देशपांडे असं म्हणतात की, जावाई आणि सासऱ्याचे एकमत होणे कठीण आहे आणि ते जावयाचा उल्लेख असा करतात, की जावाई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे. पण असे नाही त्यांचे प्रेम आहे सासऱ्यांवर. असे देखील फडणवीसांनी यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com