
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole)आणि विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat)यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र असले तरी या दोन्ही नेत्यांमधील वाद कायम असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी, एबी फॉर्मचा घोळ आणि थोरातांनी दिलेला राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना येथील राजकीय घडामोडींची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ठिणगी पडली होती. पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेत त्यांच्यासाठी एबी फॉर्मपाठवला होता. मात्र, डॉ.तांबे यांनी स्वत: अर्ज न भरता आपला मुलगा सत्यजितला अपक्ष उमेदवारी भरवण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत नाना पटोले यांनी पिता-पुत्रांना पक्षातून निलंबित केले होते.
निवडणूकीच्या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावर कसा अन्याय केला याचा पाढा वाचला होता. पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या बदनामीचे षडयंत्र, तांबे कुटुंबियांना पक्षाबाहेर काढण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट करत एबी फॉर्ममधील घोळही माध्यमांसमोर उघड केला होता. त्यानंतर थोरात यांनी पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
याप्रकरणाची दिल्लीतून गंभीर दखल घेतली गेली. महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी तातडीने मुंबईत येऊन थोरातांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा नाकारला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चेन्निथला हे लवकरच महाराष्ट्रात येऊन येथील राजकिय घडामोडींची माहिती घेऊन त्याचा अहवाल हायकमांडला देणार आहे.