Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराहुल गांधींना धमकी देणाऱ्या संशयिताच्या अडचणीत वाढ; खाेटी माहिती देऊन भय निर्माण...

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या संशयिताच्या अडचणीत वाढ; खाेटी माहिती देऊन भय निर्माण केल्याचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या टप्प्यातील न्याय यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर गोळ्या झाडून किंवा त्यांना बॉम्बने ठार मारण्याचा कट रचल्याचा फाेन करुन खळबळ उडवून देणाऱ्या उच्चशिक्षित संशयिताच्या अडचणीत वाढ झाली आहे. शहर पाेलिसांच्या एटीएसने (ATS) यासंदर्भात थेट गंभीर कलमान्वये फिर्याद नाेंदविली असून संशयित एका विशिष्ट विचारसरणीचा असल्याचे समाेर येते आहे. यासह त्याच्या घरातून पाेलीसांनी (Police) एका सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसेसचे काही बनावट ओळखपत्र जप्त केले आहे….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीराम सी जोशी (वय ५३, रा. मुक्ती हाउसिंग सोसायटी, पारिजात नगर, कॉलेजरोड) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१९, ४६५, ४७१, ५०५ (२), १८२ अन्वये खोटी माहिती देणे, तोतयागिरी, बनावटीकरण, समाजात भय निर्माण करण्याचा गुन्हा गंगापूर पाेलीस ठाण्यात नोंदविला आहे. दरम्यान, याप्रकरणी सखोल तपास करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तालयाने दिले आहेत.

शहर दहशतवादी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयिताने १२ फेब्रुवारी रोजी पोलिस आयुक्तालयातील (Police Commissionerate) नियंत्रण कक्षात फोन (Phone) केला होता. गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे तातडीने संशयिताला ताब्यात घेतले होते. संशयिताची चौकशी केली असता, तो उच्चशिक्षित असून, यापूर्वी काही वर्षे तो परदेशात होता. सध्या काही वर्षांपासून तो भारतात वास्तव्यास आहे. व्यसनामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले होते.

दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर (दि. ७) रात्री गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच यानंतर नाशिक पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांसह गृह विभागाला प्रकरणाची माहिती दिली हाेती. त्यानुसार राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी व यात्रेदरम्यान सुरक्षेत वाढ करण्यात आली असून राहुल यांच्या नाशिक, मालेगाव दौऱ्यातही सुरक्षेचे नियोजन झाले आहे.

बनावट आय कार्डचा वापर, उद्देष अस्पष्ट

जाेशी याच्याकडे लंडन येथील ‘सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसेस (एम १६)’ या गुप्तहेर संस्थेचे ओळखपत्र सापडले आहे. दरम्यान, तपासात हे ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने फसवणूक, अन्य विशिष्ट कामासाठी आणि तोतयागिरीसाठी त्या ओळखपत्राचा वापर केल्याचेही पोलिस आयुक्तालयाने सांगितले. त्याचे सर्वच साेशल मिडीया अकाउंट व फाेन काॅल्सची पडताळणी केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या