पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरील वाहतूक बेटाची दुरवस्था

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरील वाहतूक बेटाची दुरवस्था

पंचवटी । वार्ताहर panchavati

नाशिकच्या मुख्य बाजारपेठेला म्हणजेच मेनरोड, रविवार पेठ यांना पंचवटीशी जोडणारा मुख्य दुवा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पूल (Punyashlok Ahilyabai Holkar Bridge)आहे. या पुलावर भव्य असे वाहतूक बेट (Traffic island)तयार करण्यात आले होते. सध्या या वाहतूक बेटाची दुरवस्था झाली आहे.

नाशिकमधून पंचवटीकडे जाताना मार्गदर्शक फलक लावण्यात आलेला आहे. उंचच उंच वाढलेल्या झाडांमुळे फलकही दिसत नाही व फलकावरील दिशादर्शक सूचना देखील दिसत नाही, अशी अवस्था झाली आहे. या वाहतूक बेटात सुशोभीकरण करण्यात आले होते, परंतु सध्या गाजरगवत आणि काटेरी गवताने फुल झाडांची जागा घेतली आहे.

दररोज लाखो प्रवासी, वाहनचालक, नागरिक या पुलावरून रात्रंदिवस ये -जा करत असतात. सर्वांना वाहतूक बेटाची दुरवस्था पाहून दुःख होत असते. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व पर्यटकांची प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणच्या वाहतूक बेटाची झालेली दुरवस्था दूर करून सुशोभीकरण करावे, आणि प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल अशा प्रकारची रचना करावी, अशी मागणी नाशिक व पंचवटीतील प्रवासी वर्गाने रहिवाशी नागरिकांनी केली आहे.

या ठिकाणी पूर्वेला सुंदर नारायण मंदिर आहे आणि पश्चिमेला पवित्र गोदामाय आहे. दोन्ही ठिकाणी दर्शनाला येणार्‍या पर्यटकांना मात्र येथील वाहतूक बेटाचे विद्रुप दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. विद्युत विभागाने या ठिकाणी डीपी बसवलेली आहे. तिच्यावर वेलींनी आक्रमण केले. अपघात होत नाही म्हणून याकडे लक्ष घेतले जात नाही असे देखील परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.

याच पुलावर पूर्वेकडील बाजूस नागरिक आपली वाहने वाहनतळ असल्यासारखी पार्क करून आपल्या कामासाठी, बाजारासाठी ये-जा करत असतात तर दुसरीकडे याच पुलाच्या सुरुवातीला नेहमीच कचर्‍याचे दर्शन होत असते. पुलाच्या दुतर्फा सुरुवातीला निर्माल्य कलश वा कचराकुंडीची व्यवस्था केल्यास पुलावर कोणीही कचरा टाकणार नाही, अशी सूचना दिल्यास पुलाची स्थिती स्वच्छ व निर्मळ राहील. पुलावर कचरा किंवा घाण टाकल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशीदेखील मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com