Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याप्रवासी निवारा : ‘असून अडचण, नसून खोळंबा’

प्रवासी निवारा : ‘असून अडचण, नसून खोळंबा’

पंचवटी । कल्पेश अहिरे Panchavati

पंचवटीतील मुख्य रस्त्यांवर शहर वाहतूककरता विविध ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून निवारा शेड (Shelter shed)उभारण्यात आले आहेत. परंतु निवारा शेड चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आल्याने तसेच संबंधित विभागाचे निवारा शेडकडे दुर्लक्ष झाल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत.

- Advertisement -

पंचवटीतील महामार्गावरील अमृतधाम येथील रस्त्यावर निवारा शेड उभारण्यात आले आहेत. सदर परिसर महामार्गाला लागून असल्याने व फारशी शहर वाहतूक या ठिकाणी नसल्याने या निवारा शेडचा उपयोग फक्त ज्येष्ठ नागरिकांना आराम करण्यासाठी झाला आहे. या निवारा शेडवर औदुंबरनगर असे चुकीचे नाव देण्यात आले आहे.

दिंडोरीरोडवरील राज स्वीटसमोर सुंदर निवारा शेड उभारण्यात आले होते. परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी वर्गाला बसण्यासाठी जी व्यवस्था केली होती नेमकी तीच गायब झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी वर्गाला संरक्षक भिंतीवर बसून बसची प्रतीक्षा करावी लागते. प्रवासी कमी व इतरच लोक या ठिकाणी आराम करत असतात, असे दिसत आहे.

अमृतधाम ते तारवालानगर या रस्त्यावर रेशीम बंध बँक्वेट हॉलजवळ निवारा शेड नव्याने उभारण्यात आले आहे.परंतु स्वच्छतेअभावी या ठिकाणी कोणीही थांबण्यास धजावत नाही. चारही बाजूने गाजर गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवासीवर्गाला थांबणे शक्य होत नाही. शरद पवार मार्केट पेठरोड येथे आरटीओ कॉर्नरच्या भिंतीला लागून दोन निवारा शेड उभारण्यात आले होते. दोन्ही निवारा शेडची वेळोवेळी काळजी न घेतली गेल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. एका निवारा शेडमध्ये बसण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे प्रवासीवर्गाला सतत उभे राहावे लागते.

त्याचबरोबर एका निवारा शेडला निवारा कशाला म्हणावे हेच दिसत नाही. बसण्यासाठी तर सोयच नाही अशी वाईट अवस्था झाली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था व बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांची उभे राहण्याची व प्रतीक्षा करण्याची जागा निश्चित केल्यास शासनाचा पैसा वाया जाणार नाही व प्रवासीवर्गाला निवारा शेडचा पुरेपूर फायदा घेता येईल. निवारा शेड उभे करण्यापूर्वी तेथील सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. शेकडो निवारा शेड चुकीच्या सर्वेक्षणामुळे वाया गेले आहेत. अर्थात, निवारा शेडसाठी खर्च केलेला पैसा वाया गेला आहे.

नव्याने अनेक निवारा शेड उभे केले आहेत. त्या ठिकाणी प्रवासीवर्ग सहसा बसची प्रतीक्षा करताना दिसत नाही. याचा अर्थ सदर निवारा शेडदेखील चुकीच्या जागेवर उभारण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ऐकावयास मिळाली. निवारा शेड उभारताना परिसरातील प्रवासीवर्ग यांच्याशी चर्चा करून उभारावेत, अशीदेखील मागणी प्रवासीवर्गाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या