अनुकंपाधारकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन व्हावे

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचे आयुक्तांना पत्र; आंदोलनाचा इशारा
अनुकंपाधारकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन व्हावे

नाशिक । प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका सेवेतील गट 'क' व 'ड' संवर्गातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशालाा चार महिन्यांच्या कालावधी उलटला तरी अद्याप प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नियुक्तीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार याची लेखी माहिती द्या, अन्यथा आंदोलन होणार असा इशारा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिला आहे.

नाशिक महापालिकेचा क वर्ग आकृतिबंध नुसार ७०९० पदे मंजूर असून सद्यस्थितीत सेवानिवृत्ती तसेच अन्य नानाविध कारणांमुळे २२०० पदे रिक्त झाली आहेत. सध्या स्थितीत ४८०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेला वाढत्या लोकसंख्येनुसार शहराला आवश्यक सुविधा देणे शक्य नाही. दुसरीकडे आस्थापना खर्च ३५ टक्क्यापेक्षा अधिक असल्यामुळे रिक्त पदे भरण्यास निर्बंध असून अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी अनुकंपा तत्त्वावरील दीडशेहून अधिक मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याबाबत आदेश दिले होते.

माजी आ. वसंत गिते यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता तसेच एप्रिल महिन्यामध्ये या संदर्भात कारवाई होत नसल्याचे बघून गिते यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र पुन्हा एकदा ही प्रक्रिया रखडली असून ज्या वारसांना सामावून घ्यायचे आहे त्यांना नानाविध कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगून चालढकल केली जात असल्याचे तक्रारी शिवसेनेकडे आले आहेत.

या पार्श्वभूमीवर बोरस्ते यांनी प्रशासन उपायुक्त घोडे पाटील यांच्याशी चर्चा करून न्याय देण्यास उशीर म्हणजेच न्याय देणेच नाकारणे असा अर्थ होत असल्याचे सांगत या अनुकंपा नियुक्तीबाबत आत्तापर्यंत काय कार्यवाही केली व ही प्रक्रीया कधीपर्यंत पूर्ण करणार याबाबतची माहिती लेखी स्वरुपात देण्याची सूचना केली. तसेच प्रशासनाचा वेळकाढूपणा व हलगर्जीपणा दिसून आल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही बोरस्ते यांनी दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com