Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककांदा पुन्हा कोसळला

कांदा पुन्हा कोसळला

लासलगाव, नाशिक । Lasalgaon (प्रतिनिधी)

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात काल काही जुने फोटो सोशल मीडियात व्हायरल होताच यामुळे भयभीत झालेल्या शेतकर्‍यांनी आज लासलगाव बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणल्यामुळे सकाळच्या सत्रात लाल आणि उन्हाळ कांद्याच्या सरासरी भावात 650 ते 750 रुपयांनी घसरण झाली.

- Advertisement -

जेव्हा ही निव्वळ अफवा असल्याची माहिती शेतकर्‍यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांचीही काहीशी निराशा झालेली बघायला मिळाली. सोमवारी 1300 वाहनांमधून लासलगाव बाजार समितीत विक्रमी कांदा आवक झाली होती.

शनिवारी उन्हाळ कांद्याचे किमान दर 1700 रुपये होते तर कमाल 4700 रुपये होते. सरासरी 4150 रुपये प्रतीक्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. हाच दर सोमवारी किमान 1700 तर कमाल 4400 रुपये राहिला असून यामध्ये 300 रुपयांची घसरण झाल्याचे पहावयास मिळाले. तर उन्हाळ कांदा सरासरी 3300 रुपये दराने विक्री झाला.

यामध्ये शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी 750 रुपयांची घसरण झाली असून त्या तुलनेत लाल कांद्याला शनिवारी चांगला बाजारभाव मिळाला होता. शनिवारी लाल कांदा किमान 2600 ते कमाल 5001 दराने विक्री झाला होता. तर सरासरी या कांद्याचा दर 4100 रुपये इतका राहिला होता. हाच कांदा आज सोमवारी किमान 2100 रुपये तर कमाल 5080 रुपये दराने विक्री झाला. सरासरी कांदा 3450 रुपयांनी विक्री झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे लाल कांद्यातही आज 750 रुपयांची घसरण झाली आहे.

लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक 9600 क्विंटल इतकी झाली होती तर लाल कांद्याची आवक अंदाजे 150 क्विंटल इतकी झाली होती. आज 1300 वाहनांमधून कांद्याची विक्रमी आवक झाली.

कांद्याचा ‘महापूर’

जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी असल्याने बंद होते. त्यातील काही बाजार समित्यांचे कामकाज गेल्या आठवड्यात सुरू झाल्यानंतर बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होण्याचा आजचा पहिला दिवस होता.

त्यामुळे सोमवारी (दि.23)बाजार समित्यांमध्ये कांद्याचा ‘महापूर’ आल्यागत चित्र होते.कांद्याची आवक वाढेल, पुन्हा लॉकडाऊन होईल, मार्केट बंद होतील या आणि अशा अनेक प्रकारच्या अफवा काल-परवा पासून सोशल मीडियावर फिरत आहेत.

या अफवांना बळी पडून कांदा उत्पादकांनी आज नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक करून स्वतःचे मोठे आर्थिक नुकसान करून घेतले आहे.

आता कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी कांद्याच्या आवकेवर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे. तो आपल्याला शक्यही आहे. उद्यापासून आपण पुढील महिनाभराचे कांदा विक्रीचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ व लाल कांद्यास अतिशय चांगला भाव मिळविण्यासाठी आवक नियंत्रणात ठेवावी.

– भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

उन्हाळ कांदा काढतांना कमी भाव असल्याने आम्ही कांदा चाळीत साठवून ठेवला. दीपावलीच्या वेळेस आवक कमी होऊन कांद्याला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. चाळीत साठवलेल्या कांद्याचे वजन कमी झाले, याव्यतिरिक्त कांदा ओला होऊन सडघाण झाली. मात्र आता कांद्याचे भाव कोसळत असल्याने आमचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले असून द्राक्षबाग, गहू, हरभरा, मका आदी पिके घेण्यासाठी पुन्हा कर्ज काढावे लागणार आहे.

मच्छिंद्र गाजरे, कांदा उत्पादक शेतकरी (नांदूरमध्यमेश्वर)

- Advertisment -

ताज्या बातम्या