Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात चोरट्यांची दुचाकींवर नजर

नाशकात चोरट्यांची दुचाकींवर नजर

नाशिक । फारुक पठाण Nashik

नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे तर नवनवीन वस्त्या निर्माण होत असल्यामुळे विविध प्रकारचे गुन्हे देखील वाढले आहे. त्यातच दुचाकी चोरीचे प्रमाण मागील काही काळात प्रचंड वाढल्यामुळे पोलिसांसमोर कडवे आव्हान ठरत आहे. शहरातून साधारण रोज एकतरी वाहन चोरीस जात आहे. मागील सहा महिन्यात शहरातून तब्बल 384 वाहन चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisement -

अनेक वेळा अगदी जुनी वाहन, मोटारसायकल किंवा स्कूटर असल्यास ती चोरी गेल्यावर त्याबाबत लोकं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देखील करत नसल्याचे दिसून येत असते. कारण गुन्हा दाखल करून जर ते वाहन पोलिसांनी हस्तगत केले तर ते वाहन सोडविण्यासाठी न्यायालयात जाऊन विविध प्रकारचे पुरावे सादर करावे लागते. त्यामुळे लोकांमध्ये त्याबाबत उदासीनता दिसून येत असते. तरी जानेवारी ते जून 2023 याकाळात शहरातील एकूण 13 पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे 384 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी अवघे 35 गुन्हे आतापर्यंत उघड झाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दुसरीकडे वाहने चोरीस जाण्याचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा मोटारसायकलचोरीची घटना दिंडोरी रोड येथे घडली. या प्रकरणी वामन थिमप्पा पुजारी (वय 48, रा. सरोवर हौसिंग सोसायटी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये (एमएच 15 ईवाय 2793) 25 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तर अशीच घटना रामकुंडाजवळ घडली. प्रशांत छबन साळवे (वय 37, रा. साई मनोदय सोसायटी, कोणार्कनगर, आडगाव शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मोटार सायकल कपालेश्वर मंदिराच्या समोर येऊन पांडे मिठाईच्या मागच्या बाजूला (एमएच 15 बीवाय 6928) ही 20 हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्ट वेगळे करून विकण्याचे प्रकार

शहरातील विविध भागातून मोटारसायकलींचे चोर्‍या करून त्याचे स्पेअर पार्ट त्वरित वेगवेगळे करून त्याची बाजारात विक्री होत असल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागते.

परराज्यात विक्री

मोटारसायकल चोरीच्या टोळ्या पोलिसांनी वेळोवेळी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, तर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातून चोरी केलेली वाहने दुसर्‍या जिल्ह्यात किंवा थेट परराज्यात विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. शहरातून सुमारे 20 ते 50 हजार रुपये पर्यंतची मोटर सायकल चोरी केल्यावर दुसर्‍या ठिकाणी त्याची पाच ते दहा हजार रुपये किमती त्वरित विक्री करण्यात येऊन चोरटे मोकळे होतात. त्यामुळे देखील तपास करण्यास अडचण येत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या