किसान एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढणार

आठवड्यात चार दिवस धावणार
किसान एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढणार

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

नाशिक,सिन्नर,व इगतपुरी, या तालुक्यातील शेतकर्‍यांचा द्राक्ष पिकांसह इतर शेतीमाल किसान एक्स्प्रेसच्या ( kisan Express )माध्यमातून उत्तर भारतातील राज्यांमध्ये जात आहे. शेतमाल मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहत असल्याने ही गाडी आठवड्यात चार दिवस असावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला यांनी केली होती. याकामी खा. हेमंत गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावल्याने येत्या नऊ ऑगस्टपासून ही गाडी आठवड्यात चार दिवस धावणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गत वर्षी खा. हेमंत गोडसेंच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांनी देवळाली ते दानापूर, (बिहार) पर्यंत देशातील पहिली विशेष किसान रेल्वे सुरु केली. त्यामुळे शेतकर्‍यांचा भाजीपाला व इतर शेतमाल तातडीने उत्तर भारतात पाठविणे सोईचे झाले. या गाडीच्या माल भाड्यामध्ये सवलत असल्याने त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग घेत आहे, मात्र करोना काळात अनेक व्यवसायिक व शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचलेले असताना शेतीमाल विक्रीतून काही प्रमाणात का होईना त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मात्र रेल्वेकडून साथ मिळणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना स्वावलंबी करण्याची घोषणा केलेली आहे.

किसान रेल्वेने जाणारा माल वेळेत पोहोचत असल्याने त्याला चांगला भाव मिळत आहे. तीन दिवस गाडी धावुनही बराच माल शिल्लक राहतो ही बाब लक्षात घेऊन चावला यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, खा हेमंत गोडसे, आ. सरोज अहिरे यांचे माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा चालवला होता. याबाबत खा. गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून ही मागणी तातडीने मंजूर घेत तशा सूचना मध्य रेल्वेला देण्यात आल्या. त्यानुसार मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांनी चावला यांना पत्र पाठवून येत्या नऊ ऑगस्टपासून चौथी गाडी सुरू करीत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे सदर गाडी सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी चार दिवस धावणार आहे. परिणामी एका वाढीव गाडीमुळे सुमारे 28 डब्या द्वारे 560 मेट्रिक टन माल उत्तर भारतात जाऊ शकेल, याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे.

याशिवाय स्वतंत्र किसान रेल्वे देवळाली ते कलकत्ता सुरू करावी व याकामी रेल्वे मंत्रालयाने लक्ष घालावे अशी मागणी रतन चावला यांचे सह सुदाम वाजे, परशराम हारक, पंढरीनाथ हगवणे, अ‍ॅड. बाळासाहेब आडके, सुरेश गवळी, सुरेश दळवी, वामन दळवी, रघुनाथ बरकले, काशिनाथ तुपे, सुकदेव आडके, ज्ञानेश्वर गोडसे, कैलास गोडसे, दत्तात्रय गोडसे,विष्णू आडके आदींनी केली आहे.

देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान रेल्वे खा. हेमंत गोडसे यांचे माध्यमातून सुरू करण्यात आली. या गाडीस मोठा प्रतिसाद मिळाला. माल शिल्लक राहत होता त्यासाठी चौथी गाडी नऊ ऑगस्ट पासून सुरू होत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झालेला आहे.

रतन चावला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com