नायट्रोजन टँकर होणार ऑक्सिजन टँकर

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
नायट्रोजन टँकर होणार ऑक्सिजन टँकर
USER

मुंबई । प्रतिनिधी

रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी आरगॉन आणि नायट्रोजन वाहून नेणा-या टँकरचे रुपांतर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा करणा-या टँकरच्या संख्येत वाढ होणार आहे.

राज्यभरातून ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने युध्द पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. जास्तीचा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अधिक टँकरची गरज भासणार आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढवण्यासाठी नवा पर्याय समोर आला आहे.

या संदर्भात गृह विभागाने परिपत्रक जारी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी टँकरची कमतरता भासत असल्याने नायट्रोजन वायू आणि आरगाँन वायूची वाहतूक करणा-या टँकरपैकी किमान ५० टक्के टँकरचे चोवीस तासांच्या आत लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करणा-या टँकरमध्ये करण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करण्यासासाठी प्रत्येक टँकरमागे एक मोटार वाहन निरिक्षक आणि एक सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही जबाबदारी राज्याच्या परिवहन आयुक्तांवर सोपवण्यात आली असून येत्या चोवीस तासात ही कार्यवाही पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्याच्या सूचना गृह विभागाने दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com