गोदा प्रदूषणमुक्तीसाठी जनजागृतीची गरज

गोदा प्रदूषणमुक्तीसाठी जनजागृतीची गरज

नाशिक । फारुक पठाण Nashik

जगात प्रसिद्ध असलेली नाशिकची पवित्र गोदावरी नदी ( Godavari River ) कधी प्रदूषणमुक्त ( Pollution) होणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी. तसेच सतत वाहत राहावी, यासाठी शहरातील काही गोदाप्रेमींनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, त्यालाही 10 वर्षे होत आली आहे. तरीही गोदावरी नदीचे रूप बदललेले नाही, अशी खंत गोदाप्रेमींनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने प्रयत्न करावे. तसेच लोकांमध्येही जनजागृती व्हावी, यानंतरच मोठ्या प्रमाणात फरक पडेल, असा विश्वास याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी व्यक्त केला आहे.

6 डिसेंबर 2012 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मागील 10 वर्षाच्या लढाईत न्यायालयाने गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अनेक निकाल दिले. पोलीस संरक्षण देताना प्रदूषण रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. पण याठिकाणी नियमित पोलीस थांबत नाही, असे चित्र आहे. विभागीय आयुक्तांना विशेषाधिकार देऊन गोदावरी प्रदूषण नियंत्रणावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली.

नदीपात्रातून शुद्ध पाणी उचलले जाते, सांडपाणी असते किती? याचे ‘ऑडीट’ होत नाही. नदीतील काँक्रिटीकरण निघत नाही. सांडपाण्याचे नाले थांबत नाहीत. गोदावरीला उगमस्थानाच्या जिल्ह्यात रासायनिकयुक्त सांडपाण्याने गटारीचे स्वरूप आले आहे. एका अर्थाने मोठे पाप नाशिकमध्ये घडते आहे. 10 वर्षांपासून सांडपाणी, नाले बंद करण्यात यश आले नाही. ज्या गोदावरीच्या नावाने निधी घ्यायचा, तिच्याकडे दुर्लक्ष करायचे, या प्रशासकीय प्रवृत्तीचे शुद्धीकरण झाल्याशिवाय गोदावरीचे शुद्धीकरण होणार नाही, असे निशिकांत पगारे यांनी सांगितले.

मागील 10 वर्षांत काही प्रमाणात बदल घडले, मात्र पाहिजे त्या प्रमाणात बदल झालेला नसल्यामुळे आजही गोदावरी नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. नदीवर बांधण्यात आलेल्या पुलांवरून सतत नागरिक घाण, कचरा टाकत असतात, मात्र पोलीस त्यांना रोखताना दिसत नाही तर दुसरीकडे गर्दुल्यांनी येथील पुलाखालील जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मध्यंतरी शहरातील नाल्यांचे पाणी देखील नदी सोडण्यात आले होते. याबाबत आवाज उठवल्यानंतर महापालिका आयुक्तांनी आदेश देत दोन दिवसांत ते पाणी बंद केले आहे. मात्र, इतर ठिकाणाहून अद्यापही गटारीचे पाणी मिसळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा ( Kumbhmela ) भरतो, जगभरातून लोक या ठिकाणी येतात मात्र गोदावरीचे रूप बदलणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com