क्षयरोग निर्मूलन चळवळीची गरज

आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांचे प्रतिपादन
क्षयरोग निर्मूलन चळवळीची गरज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

क्षयरोगाचे ( tuberculosis ) देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न वाढविण्याची आवश्यकता असून यासाठी सामाजिक चळवळीची गरज आहे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar )यांनी केले.

क्षयरोगाविरुद्ध सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्व राज्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार उपस्थित होत्या.

आयोजित बैठकीमध्ये सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडून क्षयरोग निर्मूलनविषयक प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्याने क्षयरोगाविरुद्ध एकत्रित आणि विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे.

क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी या बैठकीत आनंद व्यक्त केला. तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या राज्यात याबद्दल सुरु असलेल्या पद्धती आणि उपक्रमांची माहिती एकमेकांना द्यावी, जेणेकरुन सर्व राज्यात उत्तम उपक्रम राबवले जाऊ शकतील,असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

एकत्रित आणि परस्पर समन्वय साधून केलेले प्रयत्न आपले उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करण्यात नक्कीच लाभदायक ठरतील असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यावेळी म्हणाले.

यावेळी बोलतांना संघराज्य सहकार्याच्या तत्त्वाचा उल्लेख करत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार म्हणाल्या की, येत्या तीन वर्षात क्षयरोगाचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक पटीने वाढवण्याची गरज आहे.

कोविड महामारीच्या काळात देखील या अभियाना अंतर्गत राबवलेले उपक्रम जसे की कोविड आणि क्षयरोगाचे बाय-डायरेक्शनल स्क्रीनिंग, क्षयरोगाची औषधे रुग्णांना घरपोच पोचवणे तसेच डी.बी.टी.च्या माध्यमातून केंद्र सरकारकडून क्षय रोगींना आर्थिक मदत देखील दिली जाते. याचा उल्लेख केला. जन को जगाना है, टीबी को हराना है अशी घोषणा देत आरोग्य विभागाच्या संपूर्ण चमूने या मोहिमेत एकत्रित आणि पूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले.

यावेळी सर्व राज्यातील या मोहिमेची अंमलबजावणी करणार्‍या पथकांनी आपापल्या भागातील उपाययोजनांची माहिती दिली आणि उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या पुढच्या योजनाही सांगितल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com