'या' बाबतचे मनपा करणार पुन्हा ऑडिट

'या' बाबतचे मनपा करणार पुन्हा ऑडिट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत महापालिकेला नव्याने जलवाहिन्या ( Water Pipelines ) टाकण्यासाठी तीनशे कोटी निधीचा प्रस्तावास तत्वत: मान्यता मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका पाणीपुरवठा विभाग पाणी गळतीचे पुन्हा ऑडिट करणार आहे. त्यासाठी 60 लाख रुपये खर्च अपेक्षित असून खासगी संस्थेच्या माध्यमातून हे काम नवीन वर्षात सुरू होण्याचे संकेत मिळत आहे. 2015 साली ऑडिट झाले होते. त्या अहवालानूसार पाणी गळतीचे प्रमाण18 टक्के आहे.

शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, हे महापालिकेसमोर आव्हान आहे. शहराला दिवसाला 540 एमएलडी पाणी लागते. पण, पाणी गळती ही मोठी डोकेदुखी आहे. तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी महासभेत पाणी गळती ऑडिटचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने खासगी संस्थेमार्फत पाणी गळतीचे ऑडिट केले होते. त्यात गंगापूर धरणापासून थेट टाकण्यात आलेली जलवाहिनी, जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रियेदरम्यान वाया जाणारे पाणी, शहरात पाणी पुरवठा करणार्‍या नादुरुस्त जलवाहिन्या व बिघाड झालेले मीटर आदींचा अभ्यास करण्यात आला होता.

त्यानूसार एकूण पाणी वापराच्या 18 टक्के पाणी गळती असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात धरणातून पाणी उचलल्यानंतर जलशुध्दिकरण प्रक्रिया करताना चार टक्के पाण्याचा अपव्यय होय असल्याचे समोर आले. उर्वरीत पाणी जलवाहिन्यातील बिघाड, गळती, नळ कनेक्शनमधील नादुरस्ती आदीमुळे वाया जात असल्याचे समोर आले. पाणी पुरवठा विभागाला निधीअभावी गळती थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता आल्या नाही.

दरम्यान, अमृत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असल्याने पाणी पुरवठा विभाग ही योजना अंमलात आणण्यापुर्वी नव्याने ऑडिट करणार आहे. जेणेकरुन पाणी गळती थांबविण्यास मदत होईल. नवीन वर्षापासून ऑडिटला सुरुवात होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com