विठ्ठलमय होण्याचा क्षण म्हणजे आषाढी

विठ्ठलमय होण्याचा क्षण म्हणजे आषाढी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वारी...! प्रत्येक मराठी मनाचा,वारकर्‍यांचा जिव्हाळ्याचा उत्सव. आषाढात (Ashadhi) तर त्याचे पाय पंढरपुराकडे (Pandharpur) ओढ घेतात.ज्या देशातले लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र अशी ओळख असली तरी यंदाही करोना (Corona) संकटामुळे पायी वारी नाही, पण विठ्ठलाशी जोडलेल्या भक्तांनी मनाची एकादशी केली तर पंढरीच्या विठुरायाची नक्कीच भेट होणार आहे...

या मनाच्या एकादशी निमित्ताने त्यांच्या विचारांची शुद्धी, आहार समतोल यावर एकादशीच्या एका दिवसासाठी केलेला उपवास, केलेली विठ्ठलाची आराधना त्यापुरतीच मर्यादीत न राहता जगण्याची कृतीशील वारी व्हावी. अशाच आशयाच्या काही प्रतिक्रिया.

एकादशीला आपण जसा जाणीवपूर्वक अल्पआहार घेतो; तसेच मनाच्या शुद्धीकरणासाठी आपण जाणीवपूर्वक नकारात्मक विचार काढून तिथे सकारात्मक विचारांची पेरणी केली पाहिजे. हे सर्व संमोहनाच्या माध्यमातून शक्य होते. मनात नकारात्मक विचारांची धूळ लागू नये यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात यानिमित्ताने होऊ शकते.

- डॉ. शैलेंद्र गायकवाड (संमोहन तज्ज्ञ)

पंढरीची वारी आहे माझे घरी ! आणि न करी तीर्थव्रत ! अशी श्रद्धा असणार्‍या वारकर्‍यांना दोन वर्षांपासून पायी वारी करायला मिळत नाही,याची खंत आहे. मात्र, शासनाने किमान बस वारी करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल शासनाचे आभार. यावर्षी मोजक्या वारकर्‍यांमध्ये ही वारी करण्याची संधी मिळत आहे. हे भाग्य.

- ह.भ.प.अ‍ॅड.भाऊसाहेब गंभीरे

आपली संस्कृती वारकरी संस्कृती आहे. या संस्कृतीचे उगमस्थान पंढरीचा विठ्ठल आहे. निर्मळ मनाने विठ्ठलमय होण्याचा क्षण म्हणजे आषाढी एकादशी. आपल्या लौकिक जीवनात सर्वांभोवती प्रेमभाव, भक्तीभाव निर्माण व्हावा आणि तो सातत्याने राहावा याची एकादशी ही प्रक्रिया आहे.

- प्रा. एकनाथ पगार, देवळा

फलाहार केल्याने बुद्धी सात्विक राहते. देवाची उपासना चांगली घडते. म्हणून फलाहार करावा. फलाहार धार्मिक प्रवृत्ती आणि एकाग्रता निर्माण करते.

- सतीश शुक्ल (पुरोहित संघ अध्यक्ष)

उपवासाचा अर्थ प्रभूच्या समिप राहणे होय. त्यामुळे उपवासा दरम्यान ईश्वर चिंतन ही महत्त्वाची संकल्पना मांडण्यात आली आहे. दिवसभरात ईश्वरचिंतनच करणे गरजेचे आहे. शरीराच्या पचनक्रियाला आराम देणे, व त्या दरम्यान काया, वाचा, मने एकरूप होऊन ईश्वर चिंतन करणे हा महत्वाचा भाग या उपवासाच्या निमित्ताने सांगितलेला आहे.

एकादशीचा अर्थच मुळी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिये व आकरावे मन यांना एकत्र करून शरीरातील विषय विकारांपासून दूर करून एकाग्र करणे, त्यांवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच एकादशी होय. यासर्व इंद्रियांना एकाग्र करुन ईश्वर चिंतन आला खर्या अर्थाने एकरूप होणे हे अपेक्षित आहे.

- ह.भ.प.अण्णा महाराज आहेर हिसवाळकर (जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय, नाशिक)

दुःखा पासून मुक्ती मिळण्याच्या दृष्टीने एकादशी वेगळ महत्व आहे. त्यानिमित्ताने होणार्‍या गितापाठनातुन मनाची शांती शक्य आहे.त्यातुन कुणाचे मन दुखावु नये, मधुर वचन बोलले पाहिजे याचे नकळत आकलन होते. एकादशीच्या उपवासाच्या निमित्ताने केळी, आंबा, द्राक्ष, बादाम, पिस्ता अशा फळाचे सेवन होते.ज्यामुळे इ तर अनेक वेळे शक्य नसलेला फळांचा आहार शरिराला मिळतो.

- अनिल चांदवडकर (नवीन नाशिक)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com