आरोग्य साक्षर महाराष्ट्र घडवण्याचा मानस

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही केवळ मोहीम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस आहे.

आपल्या कुटुंब,गांव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

नाशिक विभागातील जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकार्‍यांच्या बैठकीत संवाद साधताना बोलत होते. ठाकरे म्हणाले, या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार आहे. विविध माध्यमातून आपण या मोहिमेंतर्गत जनतेपर्यंत पोहचणार आहोत. त्यासाठी आपल्या जिल्ह्यांतील स्थानिक कला व कलावंतांचाही सहभाग वाढवावा.

मला खात्री आहे प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी यात निश्चितच सहभाग घेतल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. आज या क्षणाला आपले राज्य हे एकमेव राज्य आहे की जे या करोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनवते आहे; त्याशिवाय आपण करोनामुक्त होवू शकत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना ही केवळ प्रासंगिक आपत्ती नसून ती येणार्‍या काळातल्या मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणारी आपत्ती व लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला करोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

नाशिकचा मृत्युदर कमी

नाशिक जिल्ह्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 3 हजार ने कमी झाली असून मृत्यदर राज्यात सर्वात कमी म्हणजे 1.6 इतका आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास 10 असताना तो नाशिक जिल्ह्याचा एकास 30 इतका आहे. स्वॅब तपासणीतही नाशिकची कामगिरी अत्यंत वेगवान असून औषधे. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच त्यांचा जास्तित जास्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांच्यामार्फत औषधसाठ्याची, किमतीची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 24 ते 28 मे.टन इतका ऑक्सिजन गरजेचा असून नाशिक जिल्ह्यातील स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून त्याची दररोज 55 मे. टन इतकी निर्मिती केली जात आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही, तो पुरेसा उपलब्ध आहे, असे यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *