Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामहिलांच्या मानसिक आरोग्याची गंभीर दखल घेणे गरजेचे

महिलांच्या मानसिक आरोग्याची गंभीर दखल घेणे गरजेचे

सारिका पूरकर-गुजराथी

नाशिक

- Advertisement -

भारतात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मानसिक आरोेग्याच्या समस्यांचे प्रमाण दुपटीने अधिक आहे. तसेच जगभरात भारतीय महिला इतर देशांतील महिलांपेक्षा सर्वाधिक तणावग्रस्त आढळतात. त्यामुळेच नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डमध्ये देखील २०२० पासून तणाग्रस्त महिलांचे आत्महत्या करण्याचे व त्यातही गृहिणींच्या आत्महत्यांचे प्रमाण ५० टक्के इतके गंभीर नोंदवले गेलेले आढळून आले आहे. महिलांच्या मानसिक आरोग्याची गंभीर दखल घेणे गरजेचे असून यासंदर्भात मनमोकळी चर्चा, मोकळे वातावरण तयार होणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रात व्यक्त होत आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीशी जोडली आहेत पाळेमुळे

महिलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची प्रमुख कारणे ही कारणे पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित समाजव्यवस्थेशी जोडलेली आढळतात. मुलीच्या जन्मापासूनच तिचे संगोपन, शिक्षण, विवाह या सर्वच बाबतीत दुजाभावाची , दुय्यम वागणूक मुलींना, महिलांना आजही मिळते. कोणतेही निर्णय घेण्याची, मनासारखे जगण्याची परवानगी महिलांना आपली व्यवस्था आजही देत नाही.

लहानपणापासूनच घरात व सामाजिक पातळीवर पुरुषांपेक्षा अधिक जबाबदारीची कामे महिलांनाच करावी लागतात. यात त्यांचा शारिरीक व मानसिक क्षमतेचा कस लागत असतो. कर्तव्यभावनेतून या जबाबदार्‍या पार पाडूनही सतत हेटाळणी, कामाचा क्षीण, दबाव, ताण या चक्रव्यूहात महिला आजही अडकल्या आहेत.

महिला आर्थिक दृष्टया स्वतंंत्र झाल्यानंतरही या ताणतणावात तर ैआणखीनच भर पडली आहे. कामाच्या ठिकाणीही त्यांना सतत पुरुष कर्मचार्‍यांच्या तुलनेत कमी पगार, कमी बढती अशा तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नोकरदार महिलांमध्येही नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. तसेच नोकरदार, सुशिक्षित महिलाही आत्महत्येचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत.

तसेच लैंगिक शोषण हा अत्यंत संवदेनशील विषय महिलांंच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. पाचपैकी किमान एक महिला तिच्या आयुष्यात बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्नाला, इतर प्रकारच्या लैंगिक शोषणाला सामोरी गेलेली आढळते. भारतात दर पंधरा मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतोे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण देखील मुलींना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते.

मानसिक आरोग्याप्रतीचा दृष्टिकोन बदलावा

दरम्यान, महिलांच्या मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोनही नकारात्मक असल्याने या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते, डोळेझाक केली जाते. मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागले असा एक चुकीचा समज खोडून काढण्यावर भर देणे अत्यंत आवश्यक असल्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण हा समज खोलवर रुजल्यामुळेच मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे नेहमीच टाळले जाते.

समुपदेशनासाठी येणार्‍या महिलांचे प्रमाण ५० टक्के आहेच. त्यातही गृहिणी महिलांंचे प्रमाण जास्त आहे. मात्र सकारात्मक बाब ही की महिलांना त्यांचे ताण तणाव आता समजायला लागले आहेत. त्या स्वत:हून तज्ज्ञांकडे येताहेत. त्यांच्या भावनांना समुपदेशनादरम्यान वाट मोकळी करुन देताहेत. मनमोकळे बोलताहेत. वर्षानुवर्षांचा कोंडमारा असह्य होऊन महिला आमच्याकडे येतात. माहेरी, सासरीे कुटुंबात त्यांची एक व्यक्ती म्हणून होत असलेली अवहेलना या सार्‍या मानसिक आरोग्य समस्यांच्या मुळाशी असलेलीच या संवादादरम्यान आम्हाला आढळून येते.

-डॉ.उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक

हार्मोन्स मधील बदल, कुटुंब, सामाजिक पातळीवर, कामाच्या ठिकाणी सततचा ताणतणाव व त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांकडे दुर्लक्ष हे महिलांना मानसिकदृषट्या कमकुवत बनवतात. अपेक्षा, जबादारीच्या ओझ्यातून महिलांची कधीच सुटका होत नाही.त्यामुळेही त्यांच्या भावनांचा निचरा होत नाही. ग्रामीण भागातच नाही तर शहरांमध्येही महिला या कोंडमार्‍याच्या बळी ठरतात. महिलांनी स्वत:ला थोडा वेळ देऊन वाचन, लेखन, चित्रकलेसारखे छंद जोपासून आनंदी ठेवायला हवे. मात्र सध्या सोशल मिडियामुळे यासंदर्भात जनजागरुकता येतेय. महिलाही मानसिक आरोग्याकडे बघण्याचा पूर्वग्रह टाळून समुपदेशनासाठी येताहेत. व्यक्त होत आहेत.

-डॉ.महेश भिरुड, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक

महिलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्याच त्यांना अंधश्रद्धेच्या दरीत ढकलत असतात. अंधश्रद्धेला बळी पडलेल्या 90 टक्के महिलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या आम्हाला काम करताना आढळतात. अंगात येण्यासारखे प्रकार त्यातूनच समोर येत असतात. म्हणूनच महिलांसाठी मानस मित्र या हेल्पलाईनच्या माध्यमातून मनमोकळे बोलण्याची संधी अंनिसने उपलब्ध करुन दिली आहे. महिलांसाठी गाव पातळीवर शिबिरेही या माध्यमातून शिबिरे घेऊन त्यांना मदतीचा हात आम्ही देत असतो.

-प्रशांत पोतदार, राज्य सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती.

- Advertisment -

ताज्या बातम्या