
पुणे | Thane
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना धक्का देऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये 'कमळ' फुलविले, दीर्घकाळ चाललेल्या राजकीय नाट्ट्यानंतर अखेर शिंदे- फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन करत नवीन सरकार अस्तिवात आणले...
या घडामोडींना साधारण आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे त्यांनतर आता नवीन सरकारच्या (government) निर्मितीमागील वेगवेगळे सत्य आणि तथ्य बाहेर येत आहेत.
यात आणखी भर पडली आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of BJP Chandrashekhar Bawankule) यांच्या वक्तव्याने, राज्यात नवीन सरकार येण्यामागे अदृष्य हात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
त्यांच्या या वाक्याने नवीन सरकारच्या स्थापनेचे गूढ आणखी वाढले आहे. त्यांनी हे वक्तव्य केले, मात्र नवीन सरकार येण्यामागे 'ते' अदृष्य हात (invisible hand) कोणते याचा उलगडा त्यांनी केला नाही.
पुढे बावनकुळे म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी ताब्यात घेतील या भीतीने शरद पवारांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. तसेच येत्या आठ महिन्यात उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केवळ चार आमदार राहतील असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
पहाटेच्या शपथविधीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असे कधीही वाटू शकत नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री नको अशीच भूमिका शरद पवारांची राहिली आहे.
आजच्या राजकारणातील सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्व देवेंद्र फडणवीस आहेत. मात्र पवार साहेबांना का चालत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी पवार साहेबांचे प्रयत्न सुरु असतात, असे म्हणत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.