Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकृती दलाच्या सूचना शासनाला कळवणार - पालकमंत्री छगन भुजबळ

कृती दलाच्या सूचना शासनाला कळवणार – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

करोनामुक्तीच्या मार्गात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने आरोग्य क्षेत्रात नवी समस्या निर्माण केली असून जिल्ह्यात त्यापासून प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी तज्ञ डॉक्टरांचा कृती दल स्थापन करण्यात आला आहे.

- Advertisement -

या कृती दलाने जिल्ह्याला म्युकरमायकोसिसपासून बचावासाठी मार्गदर्शकाची भुमिका निभवावी. तसेच कृती दलाच्या माध्यमातून आलेल्या प्रभावी सूचनांच्या अंमलबजावणी सोबतच शिफारशी शासनाला वेळोवेळी कळवल्या जातील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.भुजबळ फार्म येथे आयोजित टास्क फोर्सच्या भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, लॉकडाऊनचा चांगला परिणाम म्हणून दिसणारे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र समाधानकारक आहे. परंतु करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजार वेगाने वाढत आहे.त् यामुळे हा आजार होऊ नये आणि झाला तर रुग्ण बरा करण्यासाठी काय करावे लागेल, असे दुहेरी नियोजन कृती दलाने करावे. तसेच कृती दलामार्फत येणार्‍या सूचनांचा विचार करुन या आजारावर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

तसेच या आजाराशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक मुलभूत सुविधा व औषध सामुग्री पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. पोस्ट कोविड नंतर करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांची प्रतिकारशक्ती घटल्यामुळे आणि ज्यांना मधुमेह आहे अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी किंवा हा आजार झाला तर रुग्णाला बरे कसे करता येईल यावर देखील या कृती दलाने संशोधन करावे. यासाठी अजून तज्ञांची आवश्यकता असल्यास त्यांचा देखील या कृतिदलामध्ये समावेश करण्यात यावा, असेही भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, मनपा वैद्यकीय अधिकारी बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, डॉ.निखिल सैंदाणे, डॉ.आवेश पलोड, डॉ.संजय गांगुर्डे, विषय तज्ज्ञ व समिती सदस्य डॉ.शब्बीर इंदोरवाला, डॉ.पुष्कर लेले, डॉ.प्रदीप गोंधळे, डॉ. मनीष बापये, डॉ. भारत त्रिवेदी उपस्थित होते.

सहा ठिकाणी ऑपरेशन थिएटर

पोस्ट कोविड नंतर म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका अधिक आहे. त्यामुळे रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज करतांना म्युकरमायकोसिस या आजाराच्या लक्षणांची एक चेक लीस्ट सोबत देण्यात येवून लक्षणे आढळल्यास तात्काळ कान,नाक,घसा या आजावरील डॉक्टराकडून उपचार करुन घेण्याचे सूचना प्रत्येक रुग्णालयाने कराव्यात. प्रत्येक कोविड रुग्णालयांना देण्यासाठी टास्क फोर्स या आजाराबाबतीत काय करावे व काय करु नये याबाबत माहिती तयार करावी. तसेच या आजारासाठी आवश्यक असलेल्या मॉडेल ऑपरेशन थिएटर जिल्हा सामान्य रुग्णालय, मालेगांव रुग्णालय, एमव्हीपी, डॉ.झाकीर हुसेन, बिटको रुग्णालय आणि एसएमबीटी रुग्णालय या सहा ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या