आरोग्य उपकेंद्र सहा महिन्यांपासून अंधारात

वीजबिल न भरल्याने कनेक्शन तोडले
आरोग्य उपकेंद्र सहा महिन्यांपासून अंधारात

निफाड । प्रतिनिधी Niphad

तालुक्यातील लोणवाडी उपकेंद्र सहा महिन्यांपासून अंधारात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

आरोग्य उपकेंद्र सहा महिन्यांपासून अंधारात
लाच घेणे भोवले; तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यात

पालखेड मिरचीचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोणवाडी उपकेंद्राचे कामकाज चालते. या उपकेंद्रांतर्गत लोणवाडी, कारसूळ, नारायण टेंभी व बेहेड या गावांचा समावेश आहे. त्यात लोणवाडीची लोकसंख्या 1847, कारसूळ 2353, नारायणटेंभी 1500 तर बेहेडची 2693 इतकी लोकसंख्या आहे.

एकूण आठ हजारांहून अधिक लोकसंख्येसाठी या लोणवाडी उपकेंद्रात दोनच कर्मचारी नियुक्त आहेत. तर समुदाय आरोग्य अधिकारीपद एक वर्षापासून रिक्त आहे. अशा परिस्थितीत दोनच कर्मचारी चार गावांचा भार सांभाळत आहेत. तर रिक्त समुदाय आरोग्य अधिकार्‍याची जबाबदारी दावचवाडी उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. भूषण आहेर बघत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

लोणवाडी उपकेंद्रातील आरोग्य सुविधेचे चित्र फारसे आलबेल नाही. शिवाय वीजबिल न भरल्याने सहा महिन्यांपासून उपकेंद्र अंधारात आहे. बँक खाते सील करण्यात आल्यामुळे निधी काढता येत नसल्याचे डॉ. आहेर यांचे म्हणणे आहे. परंतु बँक खाते का सील आहे, याचे कारण माहीत नसल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

राज्य सरकार एकीकडे आरोग्य सुविधांवर लाखो, कोटी रुपये खर्च करत असल्याचे सांगत असताना ग्रामपातळीवर गरिबांना मोफत उपचार ज्या उपकेंद्रातून मिळतात त्याच ठिकाणी वीज व पाणी या मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या जात नसतील तर यासारखे दुर्दैव ते काय, असा प्रश्न चारही गाव व परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठस्तरावर पाठपुरावा

लोणवाडी उपकेंद्राचा प्रभार दोन महिन्यांपासून मी सांभाळत आहे. या ठिकाणी एक वर्षापासून समुदाय आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे. वीज, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

डॉ. भूषण आहेर, प्रभारी आरोग्य अधिकारी, लोणवाडी

आरोग्य सेविकेची बदली रद्द का?

लोणवाडी उपकेंद्रातील एका आरोग्य सेविकेची बदली झाली होती. त्या जागी अन्य ठिकाणाहून महिला आरोग्य सेविकेची नेमणूक झाली होती. मात्र काही दिवसांतच आधी बदली झालेल्या आरोग्य सेविकेला पुन्हा लोणवाडी उपकेंद्रात नियुक्त करण्यात आले. या बदलीनाट्यामागे नेमके कारण काय आहे, याची चर्चा सुरू आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com