Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागारपिटीने झोडपलेल्या द्राक्षांची बाजारपेठ हिरावली

गारपिटीने झोडपलेल्या द्राक्षांची बाजारपेठ हिरावली

नाशिक । सोमनाथ ताकवाले Nashik

गेल्या आठवड्यात सलग चार दिवस वादळी वारा, गारपीट आणि जोरदार पावसाने काढणीयोग्य द्राक्षांना फटका बसला. पाऊस आणि गारपिटीने द्राक्षमणी फुटले, तडकले, छिद्र पडले तसेच त्यावर काळे ठिपके आल्याने या द्राक्षांंच्या खरेदीकडे व्यापार्‍यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे द्राक्षांची बाजारपेठ हिरावली.

- Advertisement -

यंदा द्राक्षांचा पावसाच्या अगोदर हंगाम सुमारे दोन ते अडीच महिने उशिरा सुरू झाला. हंगामाच्या आरंभीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि दूसर्‍या आठवड्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. पावसाबरोबर वादळ, गारपिटीचा मारा द्राक्ष घडांना बसला. त्यामुळे मण्यांना तडे जाऊन उत्तम प्रतीच्या द्राक्षांचे घडे क्षतिग्रस्त झाले आहेत.

द्राक्षांच्या बागांचे व्यवहार परपेठेतील व्यापार्‍यांनी करण्यासाठी अवकाळीच्या आगोदर पाहणी करून शेतकर्‍यांना खरेदीचे टोकनही दिले होते. पण पाऊस झाल्याने या द्राक्षांचा दर्जाच उरला नसल्याने त्या शिवारात अथवा त्या शेतकर्‍यांकडे जाणे व्यापार्‍यांनी टाळले. त्यामुळे शेकडो क्विंटल माल खपवयाचा कसा, असा सवाल अवकाळी पावसानंतर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना सतावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, मुंबईकडे जाणार्‍या महामार्गावरील किरकोळ व्यापार्‍यांना विक्रीसाठी थेट दुकानांवर नेऊन देण्याचा मार्ग अवलंबला आहे.

मात्र यात शेतकर्‍यांना पदरमोड खर्च करून द्राक्षांची वाहतूक करावी लागत आहे. द्राक्षाच्या एका किलोला सुमारे 20 ते 25 रुपये उत्पादन खर्च असताना सध्या शेतकर्‍यांना केवळ आठ ते 15 रुपये दराने विक्री करावी लागत आहे. त्यात वाहतुकीचा खर्चही शेतकरी स्वतःच करत आहेत. त्यामुळे यंदा ज्या शेतकर्‍यांची द्राक्षे अवकाळीच्या फेर्‍यात सापडली त्या शेतकर्‍यांना तोटा होत असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांतून उमटत आहे. अवकाळीने क्षतिग्रस्त झालेल्या द्राक्षांना बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकरी बेदाणा करणार्‍या व्यावसायिकांना द्राक्षांचे मणी काढून विक्री करत आहेत. मात्र बेदाणा बनवणार्‍यांनाही क्षतिग्रस्त द्राक्ष मुबलक प्रमाणात मिळत असल्याने त्यांनी या मालाची खरेदी अल्प दराने सुरू केली आहे. त्यामुळे येथेही द्राक्षांना नीट बाजारपेठ मिळत नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

आठ दिवसांत कशी मदत मिळेल?

अवकाळीने नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे पंचनामे अल्प झालेले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे क्षेत्र पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी आपल्या शिवारात पंचनामे कधी करण्यास येणार आणि त्यानंतर शासनाकडून कधी मदत मिळणार, असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत मदत देण्याचे घोषित केले आहे. पण पंचनामेच अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे आठ दिवसांत मदत अशक्य वाटते.

नरहरी दामू कापडी, द्राक्ष उत्पादक, ब्राह्मणगाव, निफाड

खर्चाच्या तुलनेत तोटा

द्राक्ष काढणी योग्य होईपर्यंत शेतकर्‍यांना प्रतिकिलो सुमारे 20 ते 22 रुपये खर्च आलेला असतो. त्यात वाढलेली मजुरी, खुडणी प्रतिएकरी 12 ते 15 हजार रुपये दर आणि वातावरणानुसार ऐनवेळी कराव्या लागणार्‍या प्रतिबंधक उपाययोजनेचा खर्च द्राक्ष शेतीचे आर्थिक नियोजन बिघडवणारे आहे. पावसाअगोदर एसएस, थॉमसन, काळी द्राक्षे खुडणी सुरू होती. दर्जा आणि प्रतवारीनुसार द्राक्षांना 40 ते 70 रुपये किलो भाव होता. अवकाळीने द्राक्षांच्या नुकसानीनेे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या